अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : प्रत्येक पालकाच्या मनात आपल्या मुलांच्या भविष्याबाबत काही ना काही संभ्रम असतो. विदर्भातील आठ जिल्ह्यांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर हा कार्यक्रम होत असून, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या तीन दिवसांत एकाच ठिकाणी मिळतील.असे प्रतिपादन पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केले.

तीन दिवसीय ‘एज्यु एक्स्पो २०२६’ (EDU EXPO 2026) या भव्य शैक्षणिक प्रदर्शनीचे औपचारिक उद्घाटन करताना पालकमंत्री फुंडकर पुढे म्हणाले की आजच्या बदलत्या युगात विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे, पण योग्य माहितीअभावी ते मागे राहतात. हा एक्स्पो विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठे आणि उभरत्या करिअर पर्यायांची थेट ओळख करून देईल. युवा सक्षम फाऊंडेशनला पुढील काळात देशातील अजून नामांकित कंपन्यांना सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वोत्तोपरी मदत करू अशी ग्वाही दिली.

उद्घाटन सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे, आमदार साजीद खान पठाण तसेच शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, पश्चिम विदर्भातील विविध महाविद्यालयांचे संस्थाचालक आणि उद्योजक उपस्थित होते.उद्घाटन नंतर पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन सविस्तर माहिती घेत संवाद साधला.

अकोल्यातील मूर्तिजापूर रोडवरील श्रीमती राधादेवी गोयनका (RDG) महिला महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून तीन दिवसीय ‘एज्यु एक्स्पो २०२६’ (EDU EXPO 2026) या भव्य शैक्षणिक प्रदर्शनीला आज शनिवार १४ नोव्हेंबरला दिमाखात सुरुवात झाली आहे. युवा सक्षम फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सकाळी १०:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे.
• एज्यु एक्स्पो २०२६ मधील विशेष आकर्षणे:
इस्रोची (ISRO) ‘स्पेस ऑन व्हील्स’ व्हॅन: अवकाश विज्ञानाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोची विशेष फिरती प्रयोगशाळा (Exhibition Van) आणि इस्रोचे वैज्ञानिक तिन्ही दिवस प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत.

१२० हून अधिक स्टॉल्स: केजी (KG) ते पीजी (PG) पर्यंतचे विविध अभ्यासक्रम, परदेशी शिक्षण (Overseas Education), स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक कर्ज (Education Loan) आणि डिजिटल लर्निंगचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत. भव्य रोजगार मेळावा (Job Fair): या महोत्सवात तरुणांसाठी १०,००० हून अधिक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देणारा विशेष जॉब फेअर आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यशाळा: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स, संरक्षण सेवा (Defence Services), वैद्यकीय शिक्षण आणि उद्योजकता या विषयांवर तज्ज्ञांच्या विशेष कार्यशाळा आणि सेमिनार्स होणार आहेत.
८ जिल्ह्यांचा सहभाग: अकोलासह अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, वर्धा आणि जळगाव या आठ जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या महोत्सवाचा लाभ घेत आहेत.