अकोलेकरांना कुठेही जाण्याची गरज नाही ! एज्युकेशन एक्स्पोचा उद्या शेवटचा दिवस; तरुणांसाठी ‘जॉब फेअर’ची पर्वणी

    0
    4

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : तीन दिवस, एक व्यासपीठ, अमर्याद संधी, या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य ‘एज्युकेशन एक्स्पो’चा उद्या, सोमवार, १६ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी तरुणांसाठी सर्व स्तरांतील नोकऱ्या व रोजगाराची संधी देणाऱ्या भव्य ‘जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या एक्स्पोमध्ये विद्यार्थी, पालक आणि विविध शाळांनी मोठी गर्दी केली आहे. शिक्षणासोबतच करिअरच्या नव्या वाटा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. “मुलांच्या पुढील करिअरबद्दल माहिती घेण्यासाठी आम्हाला पुणे किंवा नागपूरला जावे लागले असते, मात्र या एक्स्पोमुळे एकाच ठिकाणी सर्व पर्याय आणि मार्गदर्शन मिळाले,” अशी बोलकी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली.

    मनोरंजन आणि ज्ञानाची मेजवानी
    केवळ शैक्षणिक माहितीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी हा महोत्सव पर्वणी ठरत आहे. एक्स्पोमध्ये आयोजित करण्यात आलेला थरारक एअरो-शो उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच, लहान मुलांसाठी आणि तरुणाईसाठी स्वतंत्र गेम झोन आणि खवय्यांसाठी विविध पदार्थांची रेलचेल असलेला फूड झोनही उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांसाठी हा दिवस अत्यंत आनंदाचा आणि माहितीपूर्ण ठरत आहे.

    युवा सक्षम फाउंडेशन, अकोला यांनी आयोजित केलेल्या ‘एज्यु एक्स्पो २०२६’ हा एका अर्थाने शैक्षणिक अनुष्ठान ठरले. या अनुष्ठानात समिधा टाकण्यासाठी सकाळपासूनच मैदानाबाहेर शाळांच्या बसेसच्या रांगा लागत आहेत. दोन दिवसापासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला होता. पहिल्या आणि आज दुसऱ्या अशा दोन दिवसांतच लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली.

    आठ जिल्ह्यांतून शाळांच्या सहली
    अमरावती, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, वाशिम, वर्धा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांतून अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली महोत्सवात आणल्या. बसेस भरून विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह अकोल्यात दाखल झाले. आतापर्यंत [संख्या] हून अधिक शाळांचे विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले आहेत. शाळेच्या गणवेशातील विद्यार्थ्यांचे जथे, उत्सुक चेहरे आणि प्रत्येक स्टॉलवरचे प्रश्न यांमुळे महोत्सवाला खऱ्या अर्थाने ‘ज्ञानाच्या जत्रेचे’ स्वरूप आले आहे.

    महोत्सवात १२० हून अधिक स्टॉल्स आहेत.यावर केजी ते पीजी शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, परदेशी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक कर्ज, डिजिटल लर्निंग, कौशल्य विकास, स्टार्टअप्स व उद्योजकता अशा सर्व क्षेत्रांची माहिती मिळत आहे. अकोला, नागपूर, पुणे येथील नामांकित शैक्षणिक संस्था, करिअर तज्ज्ञ आणि प्रशिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी विद्यार्थी थेट संवाद साधत आहेत. आपली आवड आणि क्षमता जाणून घेण्यासाठी सायकोमेट्रिक मूल्यांकनाच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत.

    इस्रोची ‘स्पेस ऑन व्हील्स’ – विद्यार्थ्यांचे खास आकर्षण
    विज्ञान भारतीच्या सौजन्याने प्रांगणात उभारलेली इस्रोची ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही फिरती अवकाश प्रदर्शनी सहलींसोबत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे आकर्षण ठरली आहे. अवकाश संशोधनाच्या वैज्ञानिक गमतीजमती पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या लांबच लांब रांगा दिवसभर दिसून आल्या.

    तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळांना प्रतिसाद
    विज्ञान व रोबोटिक्स कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. रविवारी रवी साहू यांनी ‘मोठ्या करिअरचे स्वप्न’, धनंजय रावत यांनी ‘खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान व खगोलशास्त्र’, डॉ. गणेश आर व डॉ. स्वरूपमा यांनी ‘रोबोटिक्स’,यांनी ‘तुमचे भविष्य, तुमची आवड’, रवींद्र ठाकरे यांनी ‘शून्य रुपयांत स्टार्टअप’ आणि अनिता नाडकर्णी यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख’ या विषयांवर मार्गदर्शन केले. रवींद्र गोडबोले यांनी प्रतिकृतींच्या साहाय्याने खगोलशास्त्र कार्यशाळा घेतली.

    तरुणाईचा जल्लोष
    क्रिएटर कॉन्क्लेव्ह, ‘करिअर अनकट’ लाईव्ह पॉडकास्ट स्टुडिओ, फ्युचर स्किल्स अरेना, विविध विद्यार्थी स्पर्धा आणि कार्यशाळांना तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कंटेंट क्रिएशन यांसारख्या नव्या युगातील करिअर संधींबद्दल विद्यार्थ्यांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!