अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : येथील मूर्तिजापूर रोडवरील श्रीमती राधादेवी गोयनका (आरडीजी) महिला महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘एज्युकेशन एक्स्पो २०२६’ ला काल शनिवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. हजारो विद्यार्थ्यांनी स्वतः हजेरी लावत प्रत्येक स्टॉलवर जाऊन करिअर आणि शिक्षणाच्या विविध संधींची इत्यंभूत माहिती घेतली. या गर्दीमुळे आणि उत्साहामुळे संपूर्ण परिसराला जणू एका ‘शैक्षणिक कुंभमेळ्याचेच’ स्वरूप प्राप्त झाले आहे.

‘प्रदर्शन नव्हे, तर भविष्याचं एक्स्पोजर’
युवा सक्षम फाउंडेशनच्या वतीने १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित हा उपक्रम केवळ एक पारंपरिक प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘एक्स्पोजर’ (Exposure) देणारा मंच ठरला आहे. ‘एक्स्पो’मधील ‘एक्स्’ म्हणजेच संधींचे नवे दालन खुले करून देणे, या संकल्पनेला साजेसे नियोजन येथे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी अकोल्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील (अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आदी) पालक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पाहणी केली.
आज सुट्टीत ‘ज्ञानगंगेत’ न्हाऊन निघण्याची सुवर्णसंधी
आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने आरडीजी मैदानावर गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. तीन दिवसांसाठी अकोल्यात अवतरलेल्या या ‘शिक्षणाच्या ज्ञानगंगेत’ विद्यार्थी व पालकांनी आवर्जून न्हाऊन निघावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आज दिवसभर अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि करिअर मार्गदर्शक विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील संधींवर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
‘एज्युकेशन एक्स्पो २०२६’ मधील विशेष आकर्षणे:

इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) ची झलक: इस्रोची विशेष फिरती प्रयोगशाळा (Exhibition Van) आणि अंतराळ विज्ञानाशी संबंधित कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत.
- १०० हून अधिक स्टॉल्स (KG ते PG): नामवंत विद्यापीठे, प्रतिष्ठित महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि परदेशी शिक्षणाचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
- आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्ये: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स कार्यशाळा, क्रिएटर कॉन्क्लेव्ह आणि लाईव्ह पॉडकास्ट स्टुडिओ यांचा तरुणांना प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे.
- जॉब फेअर व सायकोमेट्रिक टेस्ट: ३० हून अधिक नामांकित कंपन्यांचा रोजगार मेळावा (Job Fair) आणि विद्यार्थ्यांचा कल ओळखण्यासाठी मोफत करिअर कौन्सिलिंग व सायकोमेट्रिक टेस्टची सोय करण्यात आली आहे.
सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या शैक्षणिक महोत्सवात प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, आज सुट्टीचा लाभ घेत जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे दिलीपराज गोयनका, पंकज कोठारी, डॉ. गजानन नारे, प्रा.नितीन बाठे, हरेशभाई शहा, जयंत पडगिलवार, निकेश गुप्ता, डॉ.पवन माहेश्वरी, डॉ.नितीन ओक, नरेंद्र देशपांडे, सिद्धार्थ रुहाटिया, आलोककुमार गोयनका, राजेश जोध, अजय सेंगर, अमोल अग्रवाल, ललित काळपांडे, सिमरनजीतसिंह नागरा, सौरभ गोयनका, राम ठक्कर, प्रफुल्ल संघवी, मधुर खंडेलवाल, सुनील नंद, मोहिनी मोडक, काजल राजवैद्य, सीमा बक्षी, सुनील अग्रवाल, अल्पा तुलशान, मो.सोहेल अख्तर, प्राचार्य डॉ.ललित भट्टी, परिमल मुजुमदार, विजय तांदले, सीए. नीरज राठी, मनोज महाजन आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
