चेक बाऊन्स ! दुबेला ६ महिन्यांचा कारावास ; ५० हजार रुपये नुकसान भरपाई

    0
    3

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपीला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये देण्यात यावे. नुकसान भरपाईची रक्कम अदा न केल्यास आणखी १५ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा देण्याचे आदेश ७ वे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश ए.एस. देशपांडे यांनी दिले. हात उसनवारी घेतलेले ४० हजार रुपयांची परतफेड करण्यासाठी दिलेला धनादेश न वठविता परत आल्यावर हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते.

    संग्रहित छायाचित्र

    प्रकरणातील माहितीनुसार, आरोपी सतीश ठाकूरप्रसाद दुबे याला १० ऑक्टोबर २०२३ रोजी वैयक्तिक व व्यावसायिक कामासाठी ४० हजार रुपयांची आवश्यकता होती. त्याने गजानन श्रीराम वाघोडे यांच्याकडून सदर रक्कम हात उसनवारी घेतली. या रकमेच्या परतफेडीसाठी दुबे याने ४० हजार रुपयांचा धनादेश दिला. सदर धनादेश वाघोडे यांनी बँकेमार्फत वटविण्यासाठी सादर केला असता न वठविता धनादेश परत आला. या बाबत कायदेशीर नोटीस बजावली. त्यानंतर धनादेश अनादरित संबंधाने अधिनियम १८८१, कलम १३८ अन्वये न्यायालयात तक्रार दाखल केली.

    न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान आरोपीने असा बचाव केला की, तो तक्रारदाराच्या सदनिकेत भाडेकरू म्हणून राहत होता आणि सदर धनादेश हा केवळ भाडेकराराच्या अनुषंगाने सुरक्षा म्हणून दिला होता. तसेच, त्याने कर्जाची रक्कम न्यायालयाबाहेरच तक्रारदाराला परत केली असल्याचा दावाही केला. मात्र, तक्रारदाराने आरोपीचे हे सर्व दावे खोडून काढले. उलटतपासणीत आरोपीच्या बचावातील विसंगती व विरोधाभास व बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबात त्रुटी उघडकीस आणल्या.आरोपीला स्वतःचा बचाव पुराव्यानिशी सिद्ध करता आला नाही.

    दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून व अभिलेखावरील पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने सतीश दुबेला दोषी ठरवून सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व तक्रारदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात कसूर झाल्यास आरोपीला अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने ॲड. डॉ. दीपक दामोदरे यांनी बाजू मांडली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!