अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार ! दुष्काळग्रस्तांसाठी दिला 25 लाखांचा निधी

    0
    5

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलून अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे, संचालिका अपर्णा धोत्रे, संचालक अनिल जाधव, डॉ. अभिषेक तिडके, अजिंक्य राजत तसेच शिरीष धोत्रे आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या उपस्थितीत मदत निधीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेच्या या संवेदनशीलक आणि स्तुत्य उपक्रमातून सहकार क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्वा बद्दल असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

    अकोला दिव्य छायाचित्र

    महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यंदा अत्यल्प पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाणीसाठा मर्यादित असल्याने रब्बी हंगामावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांत भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा आपत्कालीन परिस्थितीत संकटग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणे, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यास हातभार लावणे आणि दुष्काळग्रस्तांनाआर्थिक आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना बँकेने व्यक्त केली.

    याच सामाजिक जाणिवेतून अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. यावेळी बँकेचे मुख्याधिकारी संजय खवले, उपमुख्याधिकारी राधिका खेरखारसिया, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी अजय माहोरे व विवेक पाटील उपस्थित होते. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सहकाराचा आधार ! दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बँकेने घेतलेला हा पुढाकार केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक संवेदनशीलता आणि सहकाराच्या मूल्यांचा प्रत्यय देणारा आहे. बँकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!