अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोल्यातील छत्रपती संभाजी पार्क येथील प्रसिद्ध दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार आणि स्थानिक महानगरपालिका प्रशासनामध्ये जोरदार वाद पेटला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने या ठिकाणी दहीहंडीचे यशस्वी आयोजन करणाऱ्या पवित्रकार यांचा अर्ज नाकारून मनपाने ऐनवेळी दुसऱ्या गटाला परवानगी दिल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

छत्रपती संभाजी पार्कची निर्मिती आशिष पवित्रकार हे नगरसेवक असताना त्यांनी विविध शासकीय निधी मंजूर करून आणून केली होती. प्रभागातील मोठ्या प्रमाणावर झालेली विकासकामे आणि सामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क या बळावर त्यांनी यंदा भाजपची उमेदवारी नाकारली गेल्यानंतरही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप सरकारला बाहेरून समर्थनही दिले. मात्र, आता त्यांच्याच हक्काच्या प्रभागात आणि त्यांनीच विकसित केलेल्या पार्कमध्ये दहीहंडी आयोजनाला प्रशासनाने खोडा घातल्यामुळे पवित्रकार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“माझा प्रभागच का?” पवित्रकार यांचा प्रशासकीय दबावाविरोधात एल्गार
या संपूर्ण वादावर जाहीर नाराजी व्यक्त करताना आशिष पवित्रकार यांनी स्थानिक प्रशासनावर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप केला आहे. ते म्हणाले, “आम्ही गेल्या १५ वर्षांपासून अत्यंत शांततेत आणि उत्साहात या ठिकाणी दहीहंडी साजरी करत आहोत. यंदाच्या आयोजनासाठी आम्ही नियमांनुसार आधीच मनपाकडे अर्ज केला होता. तरीही आमचा अर्ज जाणीवपूर्वक नाकारण्यात आला आणि आमच्यानंतर अर्ज करणाऱ्या दुसऱ्या एका गटाला तातडीने परवानगी बहाल करण्यात आली.

प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेवर थेट आक्षेप घेत पवित्रकार यांनी “माझा प्रभागच का?” असा सवाल उपस्थित केला असून, स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावापुढे झुकणाऱ्या प्रशासनाविरोधात जाहीर एल्गार पुकारला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या पारंपारिक उत्सवात अशा प्रकारे खोडा घातला गेल्याने पवित्रकार समर्थकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचा रोष पाहायला मिळत आहे.