हा रडीचा डाव ! आज ‘गोकुळ’ मध्ये घडतंय, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकते – आ.सतेज (बंटी)पाटील यांचा घणाघात

    0
    5

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : मतदानाचा हक्क बजावत जनतेने दिलेला कौल तांत्रिक कारणांनी रोखला जात असेल, तर मतदानाला अर्थ काय उरतो ? केवळ बहुमत मिळाले नाही म्हणून सरळसरळ कायदाच बदलला गेला आहे. का ? तर बहुमत नसताना ही गोकुळमध्ये आपली सत्ता प्रस्थापित होऊन मर्जीतील व्यक्तीला अध्यक्षपदी बसविण्यासाठीच हा आटापिटा केला आहे. शासनाने तब्बल ४ संचालकांची नियुक्त करण्याचा नवा नियम तात्काळ प्रभावाने लागू केला. एवढेच नव्हे तर या संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्यात आले आहे. हा प्रकार मतदारांच्या निर्णयाचा गळा घोटून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्यांची बहुमताची मुस्कटदाबी आहे. हेच जर करायचं तर मग निवडणुका घ्यायच्याच कशाला? आज गोकुळसाठी आणलेला असाच कायदा उद्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही येऊ शकतो आणि स्वीकृत सदस्यांमार्फत लोकशाहीची गळचेपी केली जाऊ शकते. मग लोकांनी दिलेल्या कौलाला काय अर्थ राहतो? असा घणाघात बंटी उपाख्य आ. सतेज पाटील यांनी युती सरकारने आज लागू केलेल्या नवीन सुधारणेवर केला आहे.

    पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची निःस्वार्थ सेवा, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नेटके नियोजन व वैकुंठभाई मेहता यांची नैतिक शिस्त यातून महाराष्ट्रात सहकार उभा राहिला. शेतकरी हाच संस्थेचा खरा मालक असावा, हेच या सर्वांचे स्वप्न होते. पण आज गोकुळच्या माध्यमातून सहकाराच्या या गाभ्यावरच घाला घातला जात आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र २९ ऑक्टोबरच्या अध्यक्ष निवड सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक ठरवून गैरहजर राहिले आणि गणपूर्तीच्या तांत्रिक कारणावर सभा तहकूब झाली. पराभव मान्य करण्याऐवजी प्रक्रियाच अडवण्याचा प्रकार आहे.आता कायद्यात बदल करून शासन नियुक्त ४ संचालकाची नियुक्ती आणि त्यांना मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय हा सत्ताधारी नेत्यांचा रडीचा डाव आहे. असे आ.पाटील यांनी सांगितले.

    प्रशासकीय काळात तोटा वाढत असताना, दुष्काळ व चाऱ्याच्या प्रश्नासमोर निर्णय घेणारे लोकनियुक्त मंडळच गोकुळमध्ये अस्तित्वात नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. विरोधात निवडून आलेल्या संचालकांनाही शेतकऱ्यांचा कौल स्वीकारावा.असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.

    या विरोधात कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने लढणार आहोतच. तथापि आज जे ‘गोकुळ’मध्ये घडत आहे, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकते. महाराष्ट्रातील सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचा आवाज बनून जनतेसमोर हे वास्तव येणे काळाची गरज आहे.

    आपला,

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!