अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : डॉ. नानासाहेब चौधरी यांनी वयाच्या 98 व्या वर्षी 10 वे पुस्तक लिहिणे आणि त्यातून सामाजिक वेदना मांडणे हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते श्रीपाद अपराजित यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला आणि डॉ.रा .ना.चौधरी ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने प्रभात किड्स येथील स्व. साहेबराव नारे स्मृती सभागृहात ज्येष्ठ शल्यचिकित्सक, साहित्यिक व आहारतज्ज्ञ डॉ. नानासाहेब चौधरी यांच्या ‘झालमुडी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात झालेला हा सोहळा साहित्य आणि आरोग्याचा एक अनोखा संगम ठरलाया कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे मार्गदर्शक प्रा . डॉ.गजानन मालोकार यांनी भूषविले होते. प्रारंभी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तथा विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे सदस्य मा. श्रीपाद अपराजित यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विचारपीठावर लेखक डॉ. नानासाहेब चौधरी, विदर्भ साहित्य संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे मार्गदर्शक डॉ. गजानन नारे, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अमोल धोरण आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. ईशानी चौधरी होते. विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे उपाध्यक्ष सुरेश पाचकवडे, कार्याध्यक्ष डॉ.विनय दांदळे, सचिव प्रा.डॉ.सुहास उगले, कार्यकारिणी सदस्य प्रा. मोहन काळे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. गजानन नारे यांनी शडॉ.नानासाहेब चौधरी यांच्या साहित्याचा प्रवास विशद केला. डॉ.चौधरी हे केवळ नामवंत शल्यचिकित्सक नसून व्यासंगी साहित्यिक व आहारतज्ज्ञ आहेत. ‘झालमुडी’ या पुस्तकातून त्यांनी साहित्यिक मूल्ये आणि जीवनशैलीचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले असल्याचे सांगितले.
या प्रसंगी भाष्य करताना सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अमोल धोरण आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. ईशानी चौधरी यांनी ‘झालमुडी’ या पुस्तकातील आशय-विषयांवर प्रकाश टाकला. वैद्यकीय पेशातील धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून साहित्याची निर्मिती करणे, मानवी अनुभव, आरोग्य व आनंदाचे पैलू पुस्तकातून मांडणे ही अनुकरणीय बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे श्रीपाद अपराजित यांनी सांगितले की, डॉ.नानासाहेब चौधरी यांनी वैद्यकीय सेवा सांभाळत असतानाही साहित्याची जी निरंतर साधना केली आहे, ती खरोखरच प्रेरणादायी आहे.’झालमुडी’ पुस्तक वाचकांच्या वैचारिक आणि बौद्धिक कक्षा रुंदावणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. गजानन मालोकार यांनी अध्यक्षीय भाषणात वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाची जोड साहित्याशी कशी देता येते, याचे उत्तम उदाहरण डॉ. चौधरी यांनी लेखनातून दिल्याचे नमूद केले. लेखक डॉ. चौधरी यांनी मनोगतात पुस्तकलेखनामागील भूमिका आणि या प्रवासातील अनुभव सांगितले. डॉ. नानासाहेबांच्या 98 व्या वाढदिवसानिमित्त अकोला कार्यकारिणीतर्फे त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाच्या सहसचिव सौ. मोहिनी मोडक तर कार्याध्यक्ष डॉ. विनय दांदळे यांनी आभार मानले.
या सोहळ्यानंतर सर्वांनी कोजागरीनिमित्त दुध व अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. या सोहळ्याला अकोल्यातील शेकडो साहित्यप्रेमी, डॉक्टर, शिक्षक व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.