अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या गौरवशाली १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त विद्या भारती, विदर्भ (अकोला जिल्हा) आणि अ.भा. साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, अकोला जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे मातरम्–राष्ट्रीय चेतनेचा महामंत्र’ या विषयावर लेखक, वक्ते आणि प्रज्ञा प्रवाहचे विदर्भ प्रचार प्रमुख अंबरीश पुंडलिक यांचे जाहीर व्याख्यातून उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेचा जागर करण्यात आला.

व्याख्यानापूर्वी साहित्य भारती प्रस्तुत राष्ट्रवंदना या कार्यक्रमात आशिष मालशे यांनी महर्षी अरविंद रचित ‘भवानी भारती’ या दीर्घ काव्याचे अभिवाचन आणि परिचय करून दिला. तसेच वंदे मातरम् काव्याने प्रेरित प्रसिद्ध काव्यरचना सादर केल्या. मंचावर प्रमुख वक्ते अंबरीश पुंडलिकसह विद्या भारती विदर्भचे अध्यक्ष सचिन जोशी, साहित्य भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रमुख मोहिनी मोडक उपस्थित होत्या.
प्रमुख वक्ते अंबरीश पुंडलिक यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा ऐतिहासिक प्रवास, त्यामागील राष्ट्रप्रेमाची भावना आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे महत्त्व याविषयी विवेचन केले. वक्त्यांनी ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा संदर्भ देत, आजच्या काळातही या गीतातील राष्ट्रनिष्ठा, सांस्कृतिक अभिमान आणि मातृभूमीप्रती कर्तव्यभावना जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय संस्कृतीचे संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजात सकारात्मक राष्ट्रचेतना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्थानिक एल.आर टी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्या भारती आणि साहित्य भारती या संस्थांच्या वतीने आयोजित व्याख्यानाला राष्ट्रप्रेमी नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि भारतीय संस्कृतीविषयी आस्था असलेल्या उपस्थितांनी प्रतिसाद दिला.’राष्ट्रचेतना, राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृती’ या त्रिसूत्रीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमातून ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक वारशाचे स्मरण करून देतानाच नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे समर्पक सूत्र संचालन गिरीजा कानडे आणि अश्विनी गोरे यांनी केले. ऋजुता रानडे यांच्या वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.