अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : मोबाईलवर आलेल्या एका अज्ञात कॉलने आणि डिलिव्हरी बॉयच्या बहाण्याने अकोल्यातील प्रसिद्ध घाऊक औषध व्यावसायिक ओम सावल यांचा मोबाईल हॅक करून पैसे मागण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅकर्सनी त्यांच्या मोबाईलचा ताबा घेताच सावल यांच्या संपर्कातील शेकडो लोकांना क्यूआर कोड (QR Code) पाठवून तातडीने ३५,०० रुपये पाठवण्याची मागणी केली. या फसवणुकीला बळी पडत दोघांनी पैसेही पाठवले. मात्र, सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला असून या गुन्ह्याचे धागेदोरे छत्तीसगडपर्यंत पोहोचले आहेत.

डिलिव्हरी बॉयचा बहाणा अन् मोबाईल हॅक
अकोल्यातील औषध व्यावसायिक ओम सावल हे कामात व्यस्त असताना त्यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले की, “तुमचे घर बंद आहे आणि बाहेर डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन उभा आहे. मी सांगत असलेल्या नंबरवर कॉल करून त्याच्याशी बोला.” सावल यांनी बाजूच्या घरात पार्सल देण्यास सांगितले, मात्र समोरील व्यक्तीने विशिष्ट नंबरवर कॉल करण्याचा आग्रह धरला. सावल यांनी त्या नंबरवर कॉल करताच त्यांचा मोबाईल अचानक बंद (नॉट रिचेबल) झाला. कामाच्या घाईत असल्याने त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले.
शेकडो जणांना ३५ हजारांची मागणी, दोघांना गंडा
मोबाईल बंद पडताच हॅकर्सनी सावल यांच्या व्हॉट्सॲप आणि संपर्क सूचीचा (Contact List) ताबा घेतला. त्यांनी सावल यांच्या नावाचा वापर करून संपर्कातील शेकडो लोकांना “तातडीने पैशांची गरज आहे” दोन तासांनंतर पैसे परत करतो. असे सांगत ३५,००० रुपयांसाठी क्यूआर कोड पाठवले. सावल यांच्या ओळखीचे असल्याने दोन जणांनी कसलीही शंका न घेता तातडीने पैसे ट्रान्सफर केले.

दरम्यान, इतर अनेकांना संशय आल्याने त्यांनी सावल यांच्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ‘नॉट रिचेबल’ येत होता. संशय बळावल्याने काहींनी सावल यांच्या मुलाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मुलाने सावल यांच्या दुसऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करून झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
सायबर पोलिसांची तत्परता, छत्तीसगड कनेक्शन उघड. : घटनेचे गांभीर्य ओळखून सावल यांनी तात्काळ सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत तात्काळ सावल यांचा मोबाईल पुन्हा सुरू करून दिला आणि अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोबाईल सुरू होताच सावल यांनी सर्वांना मॅसेज पाठवून सायबर हल्ल्याची माहिती दिली, ज्यामुळे पुढील फसवणूक थांबली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हा मोबाईल छत्तीसगड येथील एका नंबरवरून हॅक करण्यात आल्याचे समोर आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
⚠️ सायबर पोलिसांचे आवाहन: अशी घ्या काळजी!
- अनोळखी क्रमांकावर कॉल करणे टाळा: कोणत्याही डिलिव्हरी किंवा कुरिअर कंपनीचे कर्मचारी तुम्हाला दुसऱ्या नंबरवर कॉल करण्यास भाग पाडत असतील, तर सावध व्हा.
- हॅकर्स अनेकदा कोड डायल करायला लावून किंवा विशिष्ट नंबरवर कॉल करायला लावून तुमचा फोन फॉरवर्ड करतात, ज्यामुळे ओटीपी (OTP) त्यांच्याकडे जातो.
- पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा: कितीही जवळच्या व्यक्तीने पैशांची मागणी केली, तरी त्यांना थेट फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री केल्याशिवाय ऑनलाईन पैसे पाठवू नका.
