Homeमेरी दिवाली- अकोलावाली ! विदर्भ चेंबरचे व्यापक जनजागरण अभियान

मेरी दिवाली- अकोलावाली ! विदर्भ चेंबरचे व्यापक जनजागरण अभियान



अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दिवाळी केवळ प्रकाश व आनंदाचा सण नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आनंद वाटून घेण्याची संधी आहे. या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून यावर्षी ‘मेरी दिवाली, अकोलावाली’ हा अभिनव अभियान विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती विदर्भ चेंबरच्या सभागृहात आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अभियानाचा मुख्य संदेश ‘ अकोल्याचा पैसा, अकोल्याच्या कामी’ हा असून, दिवाळीच्या खरेदीसाठी शक्यतो स्थानिक व्यापारी, शेतकरी, कारागीर व व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.स्थानिक पातळीवर होणारी खरेदी केवळ एका दुकानाची विक्री नसून, त्यामागे रोजगार आणि अनेक कुटुंबांच्या उपजीविकेशी जोडलेली संपूर्ण आर्थिक साखळी असते.

आज कमी पाऊस, कमकुवत पीक व आर्थिक अडचणींचा सर्वजण सामना करीत आहेत. तेव्हा स्थानिक बाजारातून धान्य, डाळी, फळे, भाजीपाला व कृषी उत्पादने खरेदी केल्यास त्यांना मोठी मदत होईल. स्थानिक कारागिरांनी तयार केलेले मातीचे दिवे, सजावटीच्या वस्तू आणि हस्तकला साहित्य खरेदी करून त्यांना आर्थिक मदत मिळून त्याच्या कलेला प्रोत्साहन देता येईल.
स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केल्यास अकोल्यातील व्यापाराला चालना मिळेल. त्यातून दुकानदारांसोबतच कर्मचारी, वाहतूकदार, लघुउद्योजक आणि विविध सेवा देणाऱ्या घटकांनाही त्याचा फायदा होतो. आपल्याला आवश्यक असलेली वस्तू अकोल्यात उपलब्ध असताना, पैसा शहराबाहेर का जावा ? चांगली गुणवत्ता आणि योग्य किंमत उपलब्ध असेल, तर आपल्या शहरातील बाजारपेठेला प्रथम प्राधान्य देणे ही अकोल्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका ठरू शकते.

‘व्होकल फॉर लोकल’ केवळ घोषवाक्य राहू नये तर आपल्या खरेदीची सवय व्हावी या उद्देशाने असून ‘मेरी दिवाली, अकोलावाली’ हे ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा किंवा बाहेरील बाजारपेठेचा विरोध करणारे नाही. ग्राहकांनी आपली गरज, गुणवत्ता आणि किंमत यांचा विचार करून खरेदी करावी; मात्र खरेदीचा पर्याय निवडताना आपल्या शहरातील व्यापारी आणि स्थानिक बाजारपेठेलाही एक संधी मिळावी, एवढाच या अभियानाचा उद्देश आहे.

या अभियानात स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. नागरिकांच्या विश्वासाला साजेसा प्रतिसाद देताना योग्य दर, गुणवत्तापूर्ण उत्पादने, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम ग्राहकसेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले. केवळ इमारती आणि बाजारपेठांनी शहर बनत नाही, तर शहरातील माणसांमुळे खरी ओळख निर्माण होते.या दिवाळीत स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खरेदी करा; पण आपल्या शहरासाठी खरेदी करा.
या दिवाळीतील खरेदीदारी कुणासाठी आधार, कुणासाठी रोजगार व कुणासाठी आनंदाचे कारण ठरावे, या उद्देशाने विदर्भ चेंबरतर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. असे अध्यक्ष निरव वोरा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निरव वोरा, वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटिया, कनिष्ठ उपाध्यक्ष किशोर बाछूका, सचिव नीलेश अग्रवाल, कोषाध्यक्ष श्रीकांत गोयनका, सहसचिव संतोष छाजेड, माजी अध्यक्ष निकेश गुप्ता, प्रकल्प प्रमुख आशुतोष वर्मा, प्रणय कोठारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular