Homeपावनखिंड दौडीने जिल्हा क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

पावनखिंड दौडीने जिल्हा क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

• महिला फुटबॉलमध्ये आरडीजी महाविद्यालयाचा विजयी •
अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू देशपांडे यांची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ऐतिहासिक संदर्भाची जोड मिळालेल्या जिल्हा क्रीडा महोत्सव २०२६ चा प्रारंभ पावनखिंड दौडीने करण्यात आला. क्रीडाभारती आयोजित जिल्हा क्रीडा महोत्सव २०२६चा प्रारंभ वसंत देसाई स्टेडियम येथून करण्यात आला.

क्रीडाभारतीचे संघटनमंत्री प्रसन्न हरदास, ‌दत्ता कंझरकर,सतीशचंद्र भट, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.प्रशांत मुळावकर, उपाध्यक्ष गुरमितसिंग गोसल, सचिव व नगरसेवक ॲड.गिरीश गोखले, अतुल कोंडोलीकर,आनंद मनवाणी,अरुण परभणीकर,चंद्रशेखर कडू,सागर नारखेडे, संजय काळे,बाळू वानखडे,अखिलेश हातवळणे, मनमोहन जोशी,कैलास बोराळे, निलेश पवार,अभिषेक मोने, प्रथमेश,देविदास इंगळे,मनमोहन जोशी, सागर देशमुख यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.


पावनखिंड दौड स्पर्धा ३ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटात घेण्यात आली. विविध वयोगटांतील धावपटू, विद्यार्थ्यांनी दौडीत सहभाग घेतला. स्टेडियममधून सुरू झालेल्या या उपक्रमाला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू देशपांडे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देणाऱ्या या उपक्रमातून क्रीडा आणि इतिहास यांचा संबंध अधोरेखित करण्यात आला.
क्रीडाभारतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, त्यात खेळाडूंचा सहभाग वाढत आहे.
दरम्यान, जिल्हा क्रीडा महोत्सवांतर्गत महिला फुटबॉल सामन्यांचे आयोजन आरडीजी महिला महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. आरडीजी महिला महाविद्यालय आणि ड्रीम वॉरियर फुटबॉल ॲकॅडमी यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांनी सामन्यात चांगला खेळ करत एकमेकांना आवाहन दिले. अखेर आरडीजी महिला महाविद्यालयाच्या संघाने विजय मिळविला. सामन्यात आरडीजी महिला महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संघबद्ध खेळ करत आक्रमण आणि बचावाची योग्य सांगड घातली. ड्रीम वॉरियर फुटबॉल ॲकॅडमीच्या खेळाडूंनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडीजी महिला महाविद्यालयाने सामन्यावर नियंत्रण राखत विजय नोंदविला.


महिला फुटबॉल सामन्याच्या निमित्ताने स्थानिक महिला खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याची संधी मिळाली. जिल्हा क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धांमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पावनखिंड दौडीने महोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर महिला फुटबॉल सामन्यातील आरडीजी महिला महाविद्यालयाच्या विजयामुळे क्रीडा उपक्रमांना पुढेही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular