अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : संपूर्ण जगात आपल्या अदम्य शौर्यामुळे चर्चेत आलेले भारतीय पायलट स्मित मच्छर (Smit Machchhar) यांचे अकोला शहर आजोळ आहे. त्यांचा आईचे माहेर आहे. अकोल्याच्या लेकिच्या सुपुत्राने केलेल्या अविस्मरणीय, धाडसी कर्तृत्वाने आम्ही अकोलेकर ‘स्मित’ हास्याने म्हणतोय ‘भाचे बुवा’ अभिमान आहे.आमची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक स्तरावर चर्चेतील स्मित यांच्या शौर्याची कहाणी अकोलेकरांना अभिमानाची आणि भावनिक जिव्हाळ्याची ठरत आहे.आता महाराष्ट्रात ‘अकोल्याचे भाचे’ म्हणून त्यांना ओळखले जात आहे.

दुबईहून ३० सप्टेंबरला ‘तेल अवीव’ कडे जाणाऱ्या फ्लायदुबई FZ1073 या विमानाचे मुख्य पायलट म्हणून कर्तव्य बजावत होते. विमान ३४,००० फूट उंचीवर असता, ओमान मूळच्या सह-पायलटने त्यांच्यावर कॉकपिटमध्ये अचानक प्राणघातक हल्ला करून विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मित मच्छर यांनी जखमी होऊन देखील साहसाने सहपायलटचा या विमान दुर्घटनेचा कट उधळून लावत १७४ पेक्षा जास्त प्रवाशांचे प्राण वाचवले. ही बातमी मिळाली आणि अवघ्या काही तासांत स्थानिक स्तरावर त्यांचा ‘अकोल्याचा भाचा’ म्हणून अभिमानाने उल्लेख केला जात आहे. रामदासपेठेतील रहिवासी जोगी कुटुंब हे कॅप्टन स्मित मच्छर यांचे आजोळ आहे.
अकोला आणि कौटुंबिक पार्श्वभूमी : कॅप्टन स्मित मच्छर यांचे आई-वडील गीताबेन आणि उपेंद्रकुमार मच्छर हे घाटकोपर येथे राहतात. मच्छर कुटुंब मूळचे मुंबई येथील रहिवासी असले, तरी मच्छर कुटुंबाचे अकोल्याशी ऋणानुबंध आहे.अकोल्यातील रामदासपेठ स्टेशन रोड परिसरात राहणारे लक्ष्मीदास वीरचंद जोगी हे स्मित यांचे आजोबा म्हणजे स्मित यांची आई गीताबेन यांचे वडील.अनेकदा आईसोबत स्मित हे कुटुंबातील सुखदुःखाच्या प्रसंगी अकोल्यात येऊन गेले आहेत. त्यांचे मामा राजेंद्र जोगी, दीपक जोगी व भरत जोगी आजही रामदासपेठ परिसरात राहतात.
अकोला येथील स्त्री रुग्णालयाच्या माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा जोगी यांच्या गीताबेन या नणंद आहेत. गीताबेन व उपेंद्रकुमार मच्छर यांचा स्मित हा एकुलता एक मुलगा आहे.जगात स्मित यांच्या धाडसाचे कौतुक होत असल्याने अकोल्यातील नातेवाइकांसाठी हा प्रसंग विशेष महत्त्वाचा ठरला आहे.

हवेतील जीवघेणा हल्ला: ओमान मूळच्या सह-पायलटने त्यांच्यावर कॉकपिटमधील कुऱ्हाड/चाकूने अचानक प्राणघातक हल्ला केला आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात कॅप्टन स्मित यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्त्राव झाला मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी नियंत्रण सोडले नाही आणि अत्यंत हुशारीने धोक्याचा (इमर्जन्सी आणि हायजॅकिंग) कोड सक्रिय केला. शुद्ध हरपण्यापूर्वी त्यांनी कॉकपिटचा दरवाजा अनलॉक केला, ज्यामुळे विमानातील केबिन क्रू आणि काही प्रवाशांना आत येऊन त्या हल्लेखोर सह-पायलटला वेळेत रोखणे शक्य झाले व विमानाची सौदी अरेबियाच्या ताबुक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
