Homeअकोल्याच्या 'त्या' मल्टीस्टेट बँकेचा कारभार वाऱ्यावर ! खाते 'फ्रीज' केले !...

अकोल्याच्या ‘त्या’ मल्टीस्टेट बँकेचा कारभार वाऱ्यावर ! खाते ‘फ्रीज’ केले ! पैसे असूनही धनादेश नाकारले

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील एका मल्टीस्टेट शेड्युल बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ आणि अनागोंदी कारभारामुळे एका प्रतिष्ठित प्रतिष्ठानच्या व्यावसायिक खातेदाराला मानसिक धक्का बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेव्हा खातेदाराने शाखेत जाऊन विचारपूस केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. विशेष म्हणजे खातेदारांच्या खात्यात पैसे असताना धनादेश न वठविता परत करण्याची गैर कायदेशीर कृती करण्यात आली आहे. या शाखेतील कारभाराला घेऊन अनेक खातेदारांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन आदेशाने अर्ध्या डझनहून अधिक संचालक अपात्र असलेल्या या मल्टीस्टेट बँकेच्या अकोला शहरातील एका शाखेत एका व्यावसायिकाचे करंट अकाउंट असून, बॅकेच्या मागणीनुसार संबंधित खातेदाराने जवळपास एक महिन्यापूर्वीच CKYC (केंद्रीय केवायसी) साठी आवश्यक सर्व कागदपत्रे या बँकेच्या शाखेकडे सुपूर्द केली होती. मात्र, महिना उलटूनही बँकेने केवायसी प्रक्रिया पूर्ण तर केलीच नाही. उलट, बँकेने ग्राहकाचे खाते फ्रीज (स्थगित) केले असून, खात्यात पुरेशी रक्कम असतानाही खातेदार ग्राहकाने दिलेले धनादेश (चेक्स) अमान्य करून परत पाठवल्याने ग्राहकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

CKYC रखडले, खातेदाराकडे पुरावा म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंग : मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खातेदाराने नियमांचे पालन करत महिन्याभरापूर्वीच बँकेच्या शाखेत CKYC चे दस्तऐवज जमा केले होते. मात्र, बँकेकडून कागदपत्रे स्वीकारल्याची कोणतीही लेखी पोचपावती (Receipt) ग्राहकाला देण्यात आली नव्हती. बँकेच्या या दिरंगाईबाबत ग्राहकाने शाखेतील संबंधित लिपिकाशी (Clerk) संपर्क साधला असता, लिपिकाने दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ग्राहकाकडे उपलब्ध आहे. या रेकॉर्डिंगमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामात अक्षम्य हेळसांड झाल्याचे स्पष्ट होत आहे.

धनादेश परत मेमोवरील ३ क्रमांकाच्या कारणाने संभ्रम : बँकेच्या या निष्काळजीपणामुळे खातेदाराचे बँक खाते अचानक फ्रीज करण्यात आले. दरम्यान, खातेदाराने अन्य व्यक्तींना दिलेले धनादेश बँकेने न वठवता (Dishonor) परत पाठवले. विशेष म्हणजे, ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक होती. धनादेश परत करताना बँकेने दिलेल्या रिटर्न मेमोवर ३ क्रमांकाच्या कारणाचा (Reason No. 3) उल्लेख केला आहे. या कारणाचा तांत्रिक अर्थ “धनादेश जारी करणाऱ्याला (खातेदाराला) विचारा” (Refer to Drawer) असा होतो.

खात्यात पैसे असतानाही केवळ बँकेने स्वतःच्या चुकीमुळे खाते फ्रीज केल्याने हा प्रकार घडला असून,यामुळे बाजारात खातेदाराच्या विश्वासार्हतेला आणि प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते, बँकेच्या अशा एकतर्फी व चुकीच्या कारवाईविरुद्ध खातेदार खालील पावले उचलून न्याय मागू शकतो. महत्वाचे म्हणजे बँक शाखेतील संबंधित लिपिकाचे ऑडिओ रेकॉर्डिंग हा ग्राहकाची बाजू भक्कम करणारा मोठा पुरावा आहे. दरम्यान खात्यात पैसे असतानाही ‘Refer to Drawer’ चा मेमो देऊन चेक परत केल्याने समाजात आपली बदनामी झाली आहे.बँकेला वकिलामार्फत यासाठी कायदेशीर नोटीस पाठवून कारवाई करण्यात येईल मागणी असे संबंधित खातेदाराने सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular