अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पत्रकार ते संपादक म्हणून काम करताना अकोला शहरातील विविध विभागांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी माझा जवळून संबंध आला. विशेषतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिपत्याखालील अनेक अधिकाऱ्यांसोबत सातत्याने भेटीगाठी होत राहिल्या. तब्बल ३७ वर्षांच्या या प्रदीर्घ कालखंडात अनेक अधिकारी आले आणि गेले. काही सेवानिवृत्त झाले, तर काही राज्याच्या सर्वोच्च पदांवर कार्यरत आहेत. या अथांग प्रवासात सर्वांशीच व्यावसायिक संबंध राहिले, मात्र काही मोजक्या अधिकाऱ्यांशी असलेले नाते केवळ कामापुरते मर्यादित न राहता जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक बनले. याच मोजक्या आणि मनाच्या कोपऱ्यात कायमचे स्थान मिळवलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे—गजानन शेळके.

तत्कालीन ठाणेदार म्हणून रुजू झालेले, आज पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावरून सेवानिवृत्त होत असलेले गजानन शेळके म्हणजे खाकी वर्दीतील एक अत्यंत संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि तितकाच दिलदार माणूस.पोलीस दलातील तब्बल तीन दशकांहून अधिक अखंड, निष्कलंक आणि धडाकेबाज सेवा देताना पोलीस खात्यासारख्या अत्यंत खडतर, आव्हानात्मक आणि संवेदनशील विभागात कोणतीही अडचण किंवा संकट न येता इतका प्रदीर्घ काळ ‘Field’ वर गाजवणे ही सामान्य गोष्ट नाही. पोलीस दलात काम करताना अनेक आव्हाने येतात, दबाव येतो. परंतु, शेळके यांनी आपल्या संपूर्ण प्रवासात निष्ठेची कास कधीही सोडली नाही.बघता बघता आज शेळके हे पोलीस उपअधीक्षक पदावरून ताठ मानेने सेवानिवृत्त होत आहेत, ही त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती आहे.
एकूण १२ पोलीस ठाण्यांचे यशस्वी ‘ठाणेदार’ म्हणून काम पाहताना, तसेच शहर वाहतूक शाखा, ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), LCB (स्थानिक गुन्हे शाखा) आणि CID सारख्या अत्यंत महत्त्वाच्या शाखांमध्ये प्रभारी म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी नवोदित अधिकाऱ्यांसाठी सदैव पथदर्शी राहील.

देशपातळीवर गाजलेला ‘शेळके पॅटर्न’ :
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम आणि ‘Community Policing’ चे पॅटर्न प्रचंड यशस्वी ठरले.
• कोरोना काळातील दिलासा देणारी’नो मास्क नो सवारी’ मोहीम • कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटचे मॉडिफाइड सायलेन्सर’ रस्त्यावर चिरडण्याची धडक कारवाई •✓अकोट येथील संवेदनशील प्रार्थना स्थळ अत्यंत शांततेत हटवणे,गुंतागुंतीच्या विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून गुन्हेगारांना जेरबंद करणे…
या आणि अशा अनेक कामगिरीमुळे त्यांचे काही उपक्रम राज्य तर काही देशपातळीवर गाजले. याच अचाट आणि निस्पृह सेवेची पावती म्हणून त्यांना पोलीस दलातील सर्वोच्च आणि अत्यंत मानाचा “राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले, ही आम्हा सर्व मित्रांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे
पोलीस खाते व रसिकता किंवा कला यांचा संबंध तसा दुर्मिळच; पण गजानन शेळके यांनी या रूक्ष खात्यात राहूनही आपल्यातील ‘गायक आणि कलावंत’ सदैव जिवंत ठेवला. कर्तव्याचा कडक दरारा राखतानाच त्यांनी कुटुंबातील स्नेहबंध अधिक दृढ केले आणि अफाट लोकसंग्रह जोडला. एक अधिकारी म्हणून त्यांचा जितका दरारा होता, तितकाच एक मित्र आणि माणूस म्हणून ते नेहमीच हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. ते इतरांना नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा देत आले आहेत.

एक नवी सुरुवात…
गजानन शेळके सर आज शासकीय सेवेतून अधिकृतपणे निवृत्त होत असले, तरी समाजमनातून आणि आमच्यासारख्या मित्रांच्या हृदयातून ते कधीही निवृत्त होऊ शकत नाहीत. ३७ वर्षांच्या माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात मला मिळालेला हा एक उत्तम मौल्यवान मित्र आहे. मित्रवर्य, आज पोलीस गणवेशातील शेवटचा दिवस असला, तरी आमच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणि मैत्री कायम आहे. आता पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर एक ‘सच्चा मित्र’ म्हणून तुमच्या आयुष्याची ही Second Inning अधिक सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
