अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विदर्भातील कलावंतांना प्रोत्साहन आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे नागपूर येथील कमल फाउंडेशन व ऑस्कर–सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कमल सेलिब्रेशन येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ ऑस्कर या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत पहिली फेरी पूर्ण झाली. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या २६ जुलैला नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन नागपूर येथील सुप्रसिद्ध गायक तथा सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता अरविंद गेडाम, नागपूर येथीलच सुप्रसिद्ध गीतकार तथा वस्त्रोद्योग विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक सुरेंद्र मसराम, नागपुर येथील उच्च शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हेमंत असलकर, सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र सतीजा, सुप्रसिद्ध संगीत तज्ञ एस.पी सिंह, ऑस्कर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पी. कुमार, कमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश दाभाडे यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमरावती येथील सुप्रसिद्ध संगीततज्ञ शैलेश शिरभाते, मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका अलका चिमणकर, भंडारा येथील इंडियन आयडॉल सिंगर गोल्डी हुमने, नागपूरचे संगीत विशारद अमोल पांडे यांनी कामकाज सांभाळले. प्राथमिक फेरीमध्ये विदर्भातील जवळजवळ 120 कलावंत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी 26 जुलै रोजी बर्डी येथील अमृत भवन येथे होणार आहे. प्राथमिक फेरीतील सहभागी कलावंतांनी अतिशय सुंदर, कलात्मक आणि गोड आवाजात आपले सादरीकरण केले. कमल फाउंडेशन आणि ऑस्कर सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सर्व उपस्थित पाहुणे, परीक्षक आणि उपस्थित सर्व स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले.
