अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या परवानगीशिवाय व पूर्वसूचनेशिवाय बसवलेल्या स्मार्ट मीटर नंतर वीज बिल दुप्पट ते तिप्पट झाल्याच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. महावितरणच्या या ‘हुकूमशाही’ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून अकोला शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात असंतोष खदखदत आहे. महत्वाचे म्हणजे तक्रारीनंतर महावितरण कंपनीच्या नियमानुसार स्मार्ट मिटरची तपासणी केली असता बहुतांश तपासणीत मिटरमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे दिसून येते. तेव्हा दरमहा हे उपटधंदे नको म्हणून जूनेच मिटर लाऊन देण्याची मागणी केली जात आहे. परंतु आता ते शक्य नाही. असं उत्तर महावितरण कंपनीचे अधिकारी देत आहे. हा सरळसरळ ग्राहकांच्या हक्क आणि हितावर हल्ला चढवला जातो आहे. वाढीव बिलांमुळे ग्राहकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.भविष्यात या मुद्द्यावर अघटीत घडले तर कुणाला जबाबदार ठरवले जाईल

अवास्तव वीज बिलाची दुरूस्ती करून घेण्यासाठी सोपस्कार पूर्ण होईपर्यंत वीज बिल भरण्याची शेवटची तारीख निघून जाताच वीज पुरवठा खंडित होतो. स्मार्ट मिटर मध्ये ‘स्वयंचलित वीज पुरवठा खंडित’ करण्याची अफलातून करामत केली आहे. यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी संपूर्ण रक्कम जमा करावी लागते. एकुणच हा प्रकार ग्राहकांच्या हिताची ऐशीतैशी करणारा आणि ग्राहक संरक्षण कायद्याला धाब्यावर बसवत आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यापासून नेहमीपेक्षा अनेक पटींनी जास्त बिल येत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. मीटर बदलण्यासाठी कोणतीही परवानगी किंवा सूचना न देता मीटर बदलले गेले, अशी व्यथा अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, काही ग्राहकांचं घर बंद असतात किंवा त्यांचा वीज वापर अत्यंत मर्यादित असताना जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरनुसार वीज बिल अधिक येत असल्याचे पुरावे अकोला दिव्य कडे आहेत. अनेक वीज ग्राहकांनी देखील अकोला दिव्यकडे असा दावा केला आहे.
नवीन स्मार्ट मीटर खरोखरच अचूक आहेत का ? घरात वापर नसताना युनिट्सची नोंद कशी किंवा वापर नगण्य असताना वाढीव वीज बिल कसे येते, हा कळीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाढीव बिलाबाबत योग्य समाधान होत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात महावितरणकडे वाढीव रक्कमेची विचारणा केल्यास, अगोदर मीटर तपासण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांनी या सल्ल्यानंतर रितसर २३० रूपये जमा करून वीज मिटरची तपासणी केली असता बहुतांश मिटरमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे तपासणीत दिसून आले. संबंधितांनी तसा असा अहवाल दिल्यानंतर पुढे काय ? हा प्रश्न कायम आहे.
महावितरणाने लावलेले स्मार्ट मीटर सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक लूट करण्यासाठीच आहे. असा संशय मनात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने स्मार्ट मीटर प्रणालीची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही विज ग्राहकांकडून होत आहे. महावितरण कंपनीने मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काही ठिकाणी कंपनीकडून ‘स्मार्ट मीटरमुळे वीज वापर अधिक अचूक मोजला जातो, त्यामुळे बिल वाढू शकते’ असे सांगितले जात आहे; परंतु नागरिकांनी महावितरणचे हे म्हणणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
स्मार्ट मीटरमुळे सर्वसाधारणपणे वीज वापर कृत्रिमरीत्या वाढून दाखवला जातो, याचे व्यापक आणि ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. एखाद्या भागात किंवा विशिष्ट मीटरमध्ये तांत्रिक दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या समस्येचे निराकरण होईस्तोवर वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. वीज बिल अचानक वाढल्यास आणि वीज मिटर तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे तपासात दिसून आले तर ग्राहकांच्या मागील १२ महिन्यांच्या वापराची तुलना करून हातोहात दुरुस्ती का करून दिली जात नाही.

सत्ताधारी पक्षांचाही विरोध
विशेष म्हणजे, या मुद्द्यावर केवळ ग्राहक किंवा विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार व नेते आणि कार्यकर्तेही विरोध करत आहेत. वाढीव बिलांमुळे ग्राहकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.भविष्यात या मुद्द्यावर अघटीत घडले तर कुणाला जबाबदार ठरवले जाईल.
