Saturday, May 30, 2026
No menu items!
No menu items!
Homeपहिल्यांदा पवित्र 'अधिक मास' मध्ये सराफाकडे ग्राहकांची पाठ !

पहिल्यांदा पवित्र ‘अधिक मास’ मध्ये सराफाकडे ग्राहकांची पाठ !

अकोला दिव्य न्यूज : Gold Demand Drop : भारतीयांसाठी सोने फक्त एक धातू किंवा गुंतवणूक नाही तर परंपरा आणि भावनिक बंध आहे. इथं मौल्यवान धातू देखील विशिष्ट मुहूर्तावर खरेदी करण्यास प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे देशात वर्षभर सोन्याला भरपूर मागणी असते. हिंदू परंपरेनुसार ‘अधिक मास’ महिन्यात मौल्यवान धातूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, महागाईने कंबरडे मोडल्याने अनेक कुटुंबे मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे टाळत आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करणारे ग्राहकही आता बाजारातून मागे हटताना दिसत आहेत, ज्यामुळे दुसऱ्या तिमाहीतील विक्रीवर मोठा परिणाम जाणवू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि एक सरकारी निर्णयामुळे सराफा बाजाराला मोठी खिळ बसली आहे. केंद्र सरकारने११ मे २०२६ रोजी सोन्यावरील आयात शुल्कात तब्बल दुप्पट वाढ करत १५ टक्के वाढवले. या दोन्हींचा परिणाम मागणीवर होऊन सोन्याची मागणी तब्बल ७० टक्के इतकी घटली आहे.

मागणीत ७० टक्क्यांची ऐतिहासिक घसरण
‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांच्या माहितीनुसार, ड्युटी वाढल्यानंतर सोन्याच्या मागणीत सुमारे ७० टक्क्यांची घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातील सराफा व्यावसायिकांना बसला आहे. देशातील एकूण सराफा बाजारापैकी ६५ टक्के या व्यावसायिकांचा आहे.

आयात शुल्कात दुप्पट वाढ
भारतात दरवर्षी सुमारे ८०० ते ८५० टन सोन्याची आयात केली जाते. यासाठी देशाचे मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. ही व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ १५ टक्केंची वाढ केली. इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे सोन्यावरील एकूण प्रभावी कराचा बोजा (जीएसटीसह) ९.१८ टक्क्यांवरून थेट १८.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा वाढलेला कराचा बोजा ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका देणारा ठरत आहे.

ग्राहकांवर इतर महागाईचाही ताण
सुरेंद्र मेहता यांच्या मते, केवळ ड्युटी वाढल्यानेच मागणी घटलेली नाही, तर पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे नागरिक सध्या सोन्यासारख्या महागड्या वस्तूंची खरेदी टाळत आहेत.

एक ग्रॅम ज्वेलरीला मागणी
सर्वाधिक खरेदीदार असलेल्या दक्षिण भारतात सोन्याची खरेदी अत्यंत थंडावली आहे. ग्राहक आता जड आणि महागड्या दागिन्यांऐवजी कमी वजनाचे आणि कमी कॅरेटचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

भारताची वार्षिक खप आणि सध्याचा दर
भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने ग्राहकांपैकी एक असून देशात दरवर्षी सुमारे ८०० ते ८५० टन सोन्याचा खप होतो. दरम्यान, मुंबईच्या स्पॉट मार्केटमध्ये ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा भाव सुमारे १.५७ लाख प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर व्यवहार करत आहे. त्यामुळे सध्या सोन्याची चमक बाजारात काहीशी फिकी पडल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!