•मालमत्ता चोरी, जबरी चोरी व दरोड्याचे २० हजार ५१९ गुन्हे• अकोला दिव्य न्यूज : नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे २० हजार ५१९ गुन्हे दाखल झाले असून मुंबईच्या उपनगरीय लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील गर्दी गुन्हेगारांसाठी सोयीची ठरत आहे. उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये विविध गुन्हे घडतात. त्याची तक्रार रेल्वे पौलिसांकडे नोंदविली जाते.

देशभरात जीआरपीने (लोहमार्ग पोलिस) नोंदवलेल्या ८३ हजार ६९९ गुन्ह्यांपैकी फक्त महाराष्ट्रात २० हजार ५१९ गुन्हे दाखल झाले आहेत. देशात नोंदवलेल्या एकूण ५९ हजार ५२१ मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांपैकी तब्बल १९ हजार २६६ गुन्हे फक्त महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांवर घडले आहेत. महाराष्ट्रात रेल्वे प्रवासात हत्येचे ११, बलात्काराचे ६ आणि महिला व बालकांवरील अत्याचाराचे एकूण १४६ गुन्हे नोंदवले गेले आहेत. गेल्या काही वर्षांत उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात २०२४ मध्ये विनयभंगाचे ६१ गुन्हे, लैंगिक छळाचे ४५ गुन्हे, पाठलाग करण्याचे ११ गुन्हे, महिलांच्या विनयभंगाचे १३ गुन्हे आणि ह्यलैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षणह्न कायद्याशी संबंधित ३३ गुन्हे नोंदवले. आकडेवारीनुसार, महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या आणि केरळ दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
दरम्यान, इतर राज्यांच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राची आकडेवारी कमी आहे. हत्या व आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांची संख्या हरियाणामध्ये नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. इतर आकडेवारीमध्ये गंभीर दुखापतीचे १२४ गुन्हे, अपहरण आणि पळवून नेण्याचे ५३ गुन्हे, तसेच बनावटगिरी, फसवणूक आणि ठकबाजीचे ५३ गुन्हे यांचा समावेश आहे. या पैकी फसवणुकीच्या श्रेणीत आसामची आकडेवारी महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.

इतर गुन्ह्यांमध्ये, सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करण्याच्या गुन्ह्यांची सर्वाधिक संख्या (३६८) गुजरातमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर ३९ गुन्ह्यांसह महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही ३७९ गुन्ह्यांसह गुजरात अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात ४८ गुन्हे नोंदवले गेले. शस्त्र कायद्या अंतर्गत सर्वाधिक २२४ गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये नोंदवले गेले तर महाराष्ट्रात केवळ १२ गुन्हे नोंदवण्यात आले.
