विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा – संघाचे संपर्क प्रमुख पोतदार

0

अकोला दिव्य न्यूज : देशातील सध्याचा काळ हा अमृतवर्षाचा आहे. २०४७ साली आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वबोध, स्वदेशी आणि कुटुंब प्रबोधन या पंचसूत्रीची कास धरा, समाजातील सज्जनशक्तीचे जागरण करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख शैलेष पोतदार यांनी केले.

अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या जाहीर समारोप प्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चितलांगे, सर्वाधिकारी उल्हास बपोरीकर, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, समान संस्कृती, समान जीवनमूल्ये ही आमची सनातन काळापासूनची परंपरा आहे. श्रीराम जीवनमुल्याचे तर महाकुंभासह आमच्या एकत्वाचे अनेकानेक प्रतीक आहेत. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात हिंदू धर्मात भेद निर्माण करणार्‍या चुकीच्या बाबी समाविष्ट झाल्या असल्या तरी हे भेद, विषमता आपल्याला समरसतेच्या कृतीतून दूर करावे लागतील. गावागावातील पाणवठे, स्मशानभूमि, विहिरी, मंदिरे यात सर्वांना सन्मानाने प्रवेश दिला जावा व यासाठी सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम आपणास करावे लागणार आहे असे पोतदार यांनी सांगितले.

कथित विकसित पश्चिमी देशांनी निसर्गाचे शोषण करून पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण केला आहे.आमची भारतीय हिंदू संस्कृती मात्र निसर्गाचे शोषण नव्हे तर दोहन करावे असे शिकविते. वृक्षलागवड, पाण्याचे संवर्धन महत्वाचे आहेच. सोबतच आपणास पर्यावरण स्नेही बनावे लागेल.स्वदेशी आचरण जीवनात आणावे लागेल.घरात विदेशी वस्तू आणणार नाही असा संकल्प समाजाने करावा असे आवाहन त्यांनी केले.
भाषा आणि भूषा स्वदेशीच असावे असे म्हणत विदेशी आक्रमकांनी आपली कुटुंब व्यवस्था मोडण्यासाठी अनेक कपट केले. कुटुंब हे राष्ट्राचे शक्ती केंद्र आहे. कुटुंब व्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी त्यांनी विविध उदाहरण देत नागरी कर्तव्याच्या भावनेत सजगता असली पाहिजे. असे म्हणाले.

आपल्या उध्बोधनात भारतातील महान व पराक्रमी अशा इतिहास पुरूषांची माहिती देताना ते म्हणाले, आक्रमणकारी मोगलांनी अनेक मंदिरे तोडली पण अहिल्यादेवी होळकर या महापराक्रमी व साध्वी स्त्रीने स्वखर्चातून १०० पेक्षा अधिक मंदिरे बांधून त्यांचा जीर्णोद्धार केला आहे. या प्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराणा प्रताप, शीख गुरू अर्जुनदेव यांच्या महानतेवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले अतिरेक्यांना पाठिंबा देणार्‍या पाकला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकविला आहे. पण भारतातील काही घटक यावर संशय निर्माण करीत आहेत अशा घटकांना देशातील लोकांनी ओळखावे असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चितलांगे यांचे उद्बोधन झाले. शिक्षार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक सादर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here