Saturday, May 16, 2026
No menu items!
No menu items!
Homeकेवळ देवळं बांधणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं नव्हे - शिवार्चनाताई कुलकर्णी यांचे...

केवळ देवळं बांधणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं नव्हे – शिवार्चनाताई कुलकर्णी यांचे कीर्तन

अकोला दिव्य न्यूज : धर्माचं रक्षण करणं म्हणजे केवळ देवळं बांधणं नव्हे, तर आपल्या विचारांत, कृतीत आणि आचरणात रामाला जागृत करणं आहे. प्रपंचाचा गुलाम होऊन आयुष्य वाया घालवण्यापेक्षा, रामाच्या चरणी लीन व्हा आणि भारतमातेला पुन्हा सन्मान मिळवून द्या.असे आवाहन हभप शिवार्चनाताई कुलकर्णी यांनी केले.

चैत्र नवरात्र म्हणजे भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा उत्सव असल्याने अकोल्यातील बिर्ला राम मंदिराच्या प्रांगणात एक आगळावेगळा, अंतःकरणात घर करणारा कीर्तन सोहळा पार पडला. पुणे येथील हडपसर निवासी हभप शिवार्चनाताई श्रीकांत कुलकर्णी यांचे राष्ट्रभक्तीपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हे केवळ एक सांस्कृतिक सादरीकरण नव्हे, तर एक जाणीवा जागवणारे आणि ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या वचनाची साक्ष देणारे होते.

याप्रसंगी हभप शिवार्चनाताई कुलकर्णी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी संघर्षाची गाथा सांगताना आपल्या ओजस्वी आणि मधुर वाणीने श्रोत्यांना अयोध्येच्या पवित्र भूमीवर घेऊन गेले. श्रीरामजन्मभूमीचा इतिहास उलगडताना केवळ घटनांची नोंद मांडली नाही, तर त्या घटनांमागचा भाव, त्याग, आक्रोश आणि श्रद्धेचा हुंकार प्रेक्षकांच्या मनात ठसवला. अयोध्येतील संघर्ष, प्रभू रामाच्या मंदिरासाठी शेकडो रामभक्तांनी दिलेले बलिदान, त्यांचे अश्रू आणि त्याग हे त्यांनी इतक्या हृदयस्पर्शी पद्धतीने मांडले की सभागृहात उपस्थित प्रत्येकजण गहिवरून गेला.

कार्यक्रमाच्या शेवटी शिवार्चनाताईंनी प्रार्थना म्हणून एक अभंग सादर केला – राम नामाचा गजर व्हावा, या भूमीत पुनः पुन्हा राम जप व्हावा. हा अभंग ऐकून अनेक भक्तांचे डोळे पाणावले आणि संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

हा सोहळा ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात तबल्यावर मनोज जहागिरदार आणि हार्मोनियमवर सतीश खोडवे यांनी अप्रतिम साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन रश्मी देव यांनी अत्यंत समर्पक शब्दात केलं. शिवार्चनाताईंचा सत्कार सीमा सरदेशपांडे तर संगीतसाथसाठी मनोज जहागिरदार यांचे स्वागत राजु कनोजिया आणि सतीश खोडवे यांचे स्वागत ललन मिश्रा यांनी केले.

कार्यक्रमाला जयंत सरदेशपांडे, दिलीप देशपांडे, अजय शास्त्री, रामभाऊ उमरेकर, प्रकाश जोशी, रामहरी डांगे, शैलेश देव, ललन मिश्रा, शशीकांत हिवरखेडकर, आशु यादव नरेंद्र परदेशी, राजु कनोजिया, निलेश दुधलम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर आत्म्याला स्पर्श करणारा एक अनुभव होता. प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेली भक्ती, त्याग आणि धर्मासाठी झगडण्याची प्रेरणा यातून मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!