Saturday, May 16, 2026
No menu items!
No menu items!
Home‘भारत’ काळाच्या पडद्याआड ! देशभक्तीची गोडी लावणारे मनोज कुमार यांचं निधन

‘भारत’ काळाच्या पडद्याआड ! देशभक्तीची गोडी लावणारे मनोज कुमार यांचं निधन

अकोला दिव्य न्यूज : Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखलं जातं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केलं. त्यांना भारत कुमार असंही म्हटलं जातं ते याच कारणामुळे. त्यांच्या चित्रपटातली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे, मोती या गाण्याशिवाय तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेही होत नाहीत.आज अखेर मनोज कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मनोज कुमार यांच्या निधनाचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मनोज कुमार यांनी चित्रपटांमधून काम करणं सोडलं होतं. मात्र त्यांनी अभिनय केलेले चित्रपट लोकांच्या स्मरणात आजही आहेत. ‘सहारा’, ‘हनीमून’, ‘पूरब और पश्चिम’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘नसीब’, ‘नीलकमल’, ‘पत्थर के सनम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मनोज कुमार यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी हळहळली आहे.

मनोज कुमार यांना भारत कुमार या नावाने ओळखलं जायचं. त्यांचे अनेक चित्रपट हे देशभक्तीचं महत्त्व सांगणारे होते. त्यामुळे त्यांना लोक भारत कुमार म्हणू लागले होते. हे नाव त्यांनाही खूप आवडलं होतं आणि त्यांनी ते आयुष्यभर मिरवलं. रोटी कपडा और मकान या चित्रपटातील त्यांची भूमिकाही गाजली. तसंच त्यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. क्रांती या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासह काम केलं. या चित्रपटात हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, परवीन बाबी, सारिका, प्रेम चोपडा अशी तगडी स्टारकास्ट होती. हा चित्रपटही त्यातल्या गाण्यांमुळे सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केलं होतं. त्यात मुख्य भूमिकाही साकारली होती. जवळपास चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द : मनोज कुमार यांनी फॅशन या चित्रपटातून १९५७ मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तिथपासून पुढची ३८ वर्षे म्हणजे जवळपास चार दशकं ते काम करत होते. १९९५ मध्ये आलेला मैदान ए जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमधून काम केलं नाही. शोर, क्रांती, क्लर्क, रोटी कपडा और मकान, जय हिंद, उपकार या चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शकाची आणि संकलकाची भूमिकाही पार पडली. शोर या सिनेमातील इक प्यार का नगमा है हे गाणंही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आपल्या अभिनय आणि चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!