अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वडिलांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधम बापाला अकोट सत्र न्यायालयाने मरेपर्यंत म्हणजेच नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेची आणि ५० हजार रुपये दंडाची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. दादाराव श्रीराम अजने (वय४०,राहणार अकोट) असे शिक्षा झालेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

काय आहे प्रकरण?
२ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडितेची आई (फिर्यादी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतमजुरीच्या कामावर गेली होती. घरी आरोपी दादाराव, त्याचा मुलगा आणि पीडित मुलगी हजर होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आई कामावरून घरी परतली, तेव्हा तिची अल्पवयीन मुलगी शेजारी अत्यंत नाराज आणि घाबरलेल्या अवस्थेत बसलेली दिसली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. दोघेच घरी असताना नराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच २७ जानेवारी २०२२ पासून तिच्यासोबत ३ ते ४ वेळा असाच अत्याचार करण्यात आला होता. याबद्दल कोणाला काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.
या भयानक प्रकारानंतर पीडितेच्या आईने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१/२०२२ अंतर्गत भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
न्यायालयातील सुनावणी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद:
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. अजित देशमुख यांनी भक्कम बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात एकूण १२ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई (फिर्यादी), वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.
अंतिम युक्तिवादादरम्यान अॅड. अजित देशमुख यांनी न्यायालयात जोरदार बाजू मांडत सांगितले की, “आरोपीने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वडिलांच्या नात्याला काळीमा फासला आहे. अशा नराधम आरोपीला कोणतीही दया दाखवल्यास समाजात अत्यंत चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपीला कठोरतम् शिक्षा देण्यात यावी.” सरकारी वकिलांचा हा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाचा कठोर निर्णय:
न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी दादाराव अजने याला भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो अंतर्गत मरेपर्यंत (नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच ५०,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली. तसेच, आरोपीने भरलेली दंडाची रक्कम अपील कालावधीनंतर पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.