विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची प्राथमिक जबाबदारी – न्यायमूर्ती सातवळेकर ! सुरक्षित बालपण अभियान जनजागृती

    0
    5

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी समाजाची आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी सतर्क राहून पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. पी. सातवळेकर यांनी केले. स्थानिक प्रभात किड्स स्कूलमध्ये विधी व सेवा प्राधिकरणा तर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी. एस. दाभाडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका श्रीमती वंदना नारे, प्राचार्या वृषाली वाघमारे, विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी वंशिका लिलवाणी आणि आदित्य मंत्री मंचावर उपस्थित होते.

    याप्रसंगी पुढे बोलताना न्यायमूर्ती सातवळेकर यांनी विद्यार्थ्यांना आरटीई (RTE), पोक्सो (POCSO) आणि विद्यार्थ्यांशी संबंधित इतर कायद्यांची माहिती दिली. विद्यार्थींनी स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे, असे म्हणाले. तसेच मोबाईल फोनच्या वापराबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
    यावेळी बोलताना न्यायमूर्ती डी. एस. दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मिक/आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा आणि चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा सल्ला दिला. आपले आई-वडील हेच आपले खरे मित्र असून आपण त्यांच्याशी चांगला संवाद ठेवला पाहिजे आणि घरातील चांगल्या-वाईट सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत, असे ते पुढे म्हणाले.

    प्रारंभी प्रभात परिवाराच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात बोलताना प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभात अकॅडमिक फाउंडेशनचे संचालक अ‍ॅड. वल्लभ नारे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सहाय्यक अधीक्षक अमित मुधोळकर, कनिष्ठ लिपिक वैभव ताथोड, विधी स्वयंसेवक मौसरा तायडे, शिपाई धीरज मरके, प्रभातचे शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना ‘सुरक्षित बालपण अभियान’ची माहिती देणाऱ्या माहितीपुस्तिकांचे (brochures) वाटप करण्यात आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!