Homeअकोला येथे RSS च्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग ! २८ मार्च...

अकोला येथे RSS च्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग ! २८ मार्च १९३७ रोजी डॉ.हेडगेवार व हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची मोठी बैठक

अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्वतः तत्कालीन नागपूर हिंदू सभेचे उपाध्यक्ष असल्याने अकोल्यातील हिंदू महासभेच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे, कौटुंबिक संबंध होते. अकोला येथील हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही भेट आणि चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य लढ्याचे स्वरुप अधिक उग्र होऊ लागले असता, मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने १९१५ मध्ये हिंदू महासभा या संस्थेची स्थापना झाली.( हिंदू महासभा हा अधिकृत राजकीय पक्ष होता) यानंतर कॉंग्रेसचे प्रमुख नेते डॉ हेडगेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी २७ सप्टेंबर १९२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना केली. ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय पक्ष नव्हता) संघ स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात डॉ. हेडगेवार हे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा दौरा करत होते. तेव्हा कॉंग्रेस आणि हिंदू महासभा यांचे कार्यकर्ते संपर्कात असत. मात्र देशात १९३० मध्ये जंगल सत्याग्रह सुरू झाले.तेव्हा डॉ.हेडगेवार यांनी संघाच्या सरसंघचालक पदाचा राजीनामा देऊन वैयक्तिकरित्या ‘जंगल सत्याग्रहा’त भाग घेतला. तेव्हा ब्रिटिश सरकारने हेडगेवार यांना ९ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली होती.या दरम्यान इसवी सन १९३० मध्ये कॉंग्रेसच्या मुस्लिम संदर्भातील भुमिकेवर नाराजी व्यक्त करत अकोला येथील कॉंग्रेसचे प्रमुख नेते मामासाहेब जोगळेकर यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून १९३० मध्येच अकोला येथे रितसर हिंदू महासभेची स्थापना केली. डॉ. हेडगेवार देखील तत्कालीन नागपूर हिंदू सभेचे उपाध्यक्ष असल्याने अकोल्यातील हिंदू महासभेच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे व कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते.

जेव्हा १४ फेब्रुवारी १९३१ रोजी त्यांची अकोला कारागृहातून सुटका झाली, तेव्हा अकोला आणि विदर्भातील हिंदू महासभा व इतर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांची भेट घेतली व त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यानंतरच्या काळात अकोल्यातील वास्तव्यादरम्यान हेडगेवार व कार्यकर्त्यांच्या प्रमुख बैठका, भेटी बॅरिस्टर प्रमथनाथ (पी.एन.) भोपटकर तसेच दाते गुरुजी यांसारख्या हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी आणि अकोल्यातील प्रमुख देशप्रेमी व्यक्तींच्या घरी पार पडल्या होत्या. तसेच, यानंतरच्या काळात २८ मार्च १९३७ रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इस्टर कॅम्प’ (Swayamsevak Camp) दरम्यान डॉ. हेडगेवार व कार्यकर्त्यांची मोठी बैठक व भेट झाली होती, जिथे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हिंदू महासभेचे काही स्थानिक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले.
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना डॉ. हेडगेवार यांच्या संघ स्थापने मागणी भूमिका, उद्देश आणि संघाची कार्यपद्धती याबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. त्यांनी डॉ. हेडगेवारांना अनेक प्रश्न विचारले. कार्यकर्त्यांनी चर्चा सुरू केल्यावर डॉ. हेडगेवार यांनी त्यांना लगेच घाईघाईने उत्तर देण्याऐवजी, दुसऱ्या दिवशी अकोल्यात होणाऱ्या संघाच्या शाखेवर बौद्धिक वर्गासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

राजकारण निरपेक्ष शक्तीची निर्मिती: त्या बौद्धिक वर्गात डॉ. हेडगेवार यांनी स्पष्ट केले की, संघाची स्थापना केवळ तात्कालिक राजकीय उद्दिष्टे किंवा आंदोलने करण्यासाठी झालेली नाही. हिंदू समाज हा संघटित आणि शक्तिशाली झाला पाहिजे, परंतु ही शक्ती राजकारण निरपेक्ष (Politics-free) असली पाहिजे. डॉ. हेडगेवार यांचा विचार असा होता की, राजकीय पक्ष हे सत्तेच्या गणितानुसार बदलत राहतात, परंतु समाजाचे मूलभूत संघटन कायम राहिले पाहिजे. म्हणूनच त्यांनी संघाला सक्रिय व दैनंदिन राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवले.हिंदू महासभेसारख्या संघटना राजकीय किंवा तात्कालिक प्रश्नांवर लढा देत असताना, संघाने ‘व्यक्तिनिर्माण’ (Character Building) आणि रोजच्या शाखेच्या माध्यमातून समाजात शिस्त व एकात्मता आणण्यावर भर दिला पाहिजे, ही भूमिका त्यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिली.

  1. टीप : बापूसाहेब लाखनीकर यांच्या नोंदीनुसार, ही घटना संघ आणि राजकारण यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी आजही एक मुख्य दाखला म्हणून वापरली जाते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular