अहंकार चक्काचूर ! गोकुळ’ पॅटर्न: २५ पैकी १४ जागा जिंकल्या
अकोला दिव्य Special News Report : पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक वाहिनी आणि लाखो शेतकरी-दूध उत्पादकांच्या जिवाभावाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत अखेर अभूतपूर्व व ऐतिहासिक चमत्कार घडला आहे. सत्ताधारी महायुतीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, डझनभर मंत्री, खासदार आणि आमदारांची फौज एका बाजूला असताना, काँग्रेसचे आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी आपल्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’च्या माध्यमातून एकहाती कडवी झुंज देत गोकुळवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

- गोकुळच्या एकूण २५ जागांपैकी सतेज पाटील यांच्या राजश्री साहू शेतकरी समविचारी आघाडीने १४ जागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ ओलांडला आहे, तर सत्ताधारी महायुती प्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे . या पराभवामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि महाडिक कुटुंबासह संपूर्ण महायुतीला आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे
साम-दाम-दंड-भेद सगळं फेल!
या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. मतदारांना बंगळूरु आणि बेळगाव येथे सहलीवर पाठवण्यापासून ते जाहीर सभांमधून मतदारांवर दबाव आणण्यापर्यंतचे अनेक प्रकार घडल्याची जोरदार चर्चा होती Kolhapur Gokul Election. मात्र, गोकुळच्या जागरूक ठरावधारकांनी मोठ्या प्रमाणावर ‘क्रॉस व्होटिंग’ (Cross Voting) करत सत्ताधाऱ्यांची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून टाकली आणि सतेज पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर गुलाल आणि जल्लोष!
निकालाचे स्पष्ट कल येताच कोल्हापुरातील सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. एकट्या वाघाने सर्वांना घाम फोडला”, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचंड गुलालाची उधळण केली आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
राजकीयदृष्ट्या ‘गोकुळ’ पॅटर्नचे महत्त्व : गोकुळ दूध संघ हा केवळ एक दूध उत्पादक संघ नसून पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताकारणाची मुख्य किल्ली आहे.या निवडणुकीत झालेला सत्ताधाऱ्यांचा मानहानिकारक पराभव आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
