अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महावितरणच्या अधिकाऱ्याला शासकीय कार्यालयात जाऊन मारहाण करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयाने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव प्रतापराव सरनाईक यांना ४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.१३ ऑक्टोबर २०२६ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. कारावासासोबतच ५ हजार रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने साध्या कारावासाची तरतूद केली आहे.

ही घटना ३० ऑक्टोबर २०२३ रोजी वाशीम येथील पुसद नाका भागातील महावितरण कार्यालयात घडली होती. महावितरणचे तत्कालीन सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी हे आपल्या कार्यालयात शासकीय काम करत होते. त्या वेळी आरोपी वैभव सरनाईक तिथे गेले आणि “माझ्या लोकांना रोहित्र (DP) का देत नाही?” असा जाब विचारू लागले. शाब्दिक वादातून वैभव सरनाईक यांनी सहाय्यक अभियंता संजय माळी यांच्या कानशिलात मारली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
न्यायालयीन कारवाई आणि निकाल : या घटनेनंतर सहाय्यक अभियंता संजय माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशीम शहर पोलीस ठाण्यात वैभव सरनाईक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा), ३३२, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- महत्त्वाचे पुरावे: पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच, कार्यालयातील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरली.
- न्यायालयाचा निर्णय: सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने वैभव सरनाईक यांना कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत दोषी ठरवून ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या दोन्ही कलमांतर्गत मिळालेली शिक्षा त्यांना एकत्रितपणे भोगायची आहे.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. पुरुषोत्तम एस. ढोबळे यांनी काम पाहिले, तर तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक देविदास झुंगे यांनी सांभाळली होती.
