अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शासकीय कंत्राटासाठी घेतलेले ५ लाख रुपयांचे हातउसणे पैसे परत न करता दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संतोष महादेव मातरमारे याला ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, तक्रारदाराला मूळ दंडाची १० लाख रुपयांची रक्कम, तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून ९ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश १ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयात पारित केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी संतोष मातरमारे यांना एक शासकीय कंत्राट मिळाले होते. मात्र, ते काम पूर्ण करण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने तक्रारदार अरुण शिवराम शर्मा यांच्याकडून त्यांनी ५ लाख रुपये हातउसणे घेतले होते. कंत्राट पूर्ण झाल्यानंतरही आरोपीने ही रक्कम परत केली नाही. तक्रारदाराने वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर, संतोष मातरमारे यांनी अरुण शर्माला ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
न्यायालयीन लढाई आणि निकाल:
अरुण शर्मा यांनी सदर धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकला असता तो अनादरित (बाऊन्स) झाला. यानंतर शर्मा यांनी त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. पवनेश रमेशचंद्र अग्रवाल यांच्यामार्फत आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही आरोपीने पैसे न दिल्याने अखेर डिसेंबर २०२२ मध्ये न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. वर्ष २०२४ मध्ये न्याय चौकशी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे पुरावे तपासून आरोपी संतोष मातरमारे याला १ वर्षाचा साधा कारावास आणि ५ लाखांच्या दुप्पट म्हणजेच १० लाख रुपये तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले होते.

सत्र न्यायालयात अपील आणि अंतिम निकाल:
कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपीलावर १ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम निकाल लागला. सत्र न्यायालयाने आरोपीच्या शिक्षेत बदल करत ती ३ महिने केली, मात्र तक्रारदाराला मोठा दिलासा देत १० लाख रुपयांच्या रकमेवर, ज्या दिवसापासून तक्रार दाखल झाली आहे त्या दिवसापासून ९ टक्के व्याजदराने पैसे परत करण्याचे आदेश दिले.या प्रकरणात तक्रारदारातर्फे ॲड.अग्रवाल अँड स्वप्ना सुरेशचंद्र भारुका यांनी तर आरोपीतर्फे ॲड. अनिल लवाडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
