Homeहेची मागणं आता ! जर माणसांमधील माणुसकीच संपली, तर त्या उत्सवांना अर्थ...

हेची मागणं आता ! जर माणसांमधील माणुसकीच संपली, तर त्या उत्सवांना अर्थ उरणार ?

अकोला दिव्य : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : बघता बघता ११ दिवस कसे गेले, कळलेच नाही. आज बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद घालत निरोप देताना डोळ्यात अश्रू तरळले आहेत. दरवर्षी अनंत चतुर्थीला तुमचं आगमन म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा उत्सव. बाप्पाचे आगमन होते.तेव्हा ढोल-ताशांचा गजर असतो, रोषणाई असते आणि भक्तांचा अथांग सागर रस्त्यांवर लोटतो.नंतर घराघरांतून १० दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी ‘ सुखकर्ता, दुःखहर्ता……. आरतीचे सूर कानी पडतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आनंदाला उधाण असते. अखेर ११ व्या दिवशी बुध्दीदात्याला निरोप देताना देखील भक्तांचा अथांग सागर रस्त्यांवर लोटतो. घराघरांत मनोभावे पूजा केलेली मूर्तीचं विसर्जनही कुटुंबासह किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतून पुढच्या वर्षी लवकर या…. निनाद दरवर्षीच केले जाते. पण या वर्षी बाप्पाच्या मूर्तीकडे पाहताना डोळे नकळत पाणावले. मनात विचारांचे काहूर माजले आहे. समारोप उत्सव येतील आणि जातील, पण जर माणसांमधील माणुसकीच संपली, तर त्या उत्सवांना अर्थ उरणार ? या विचाराने गहिवरून आले.

लहानपणापासूनच बघत आहे की, दरवर्षी न चुकता गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही केवळ सुख,समृद्धी आणि भरभराट मागतो. बाप्पाला फक्त सुखकर्ता मानतो ना !. मात्र बाप्पा विघ्नहर्ता देखील आहे. हे विसरता कामा नये. आणि आजच्या समाजात माणसाच्या मनातील द्वेष हेच सर्वात मोठे विघ्न बनले आहे. तेव्हा समाजातील धार्मिक कट्टरता, उन्माद (अतिउत्साहाचे चुकीचे रूप) आणि मनामनातील वितुष्ट (कडू आठवणी किंवा द्वेष) दूर करण्याचे साकडे का घालत नाही ? किमान आजची परिस्थिती बघून तरी हे मागणं जरूरी आहे. ज्या समाजाने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘पसायदान’ जगाला शिकवले त्याच समाजात द्वेषाची विषवल्ली फोफावताना आम्हाला का दिसत नाही ? गर्दीतल्या जयघोषापेक्षा समाजातील वाढत्या द्वेषाचा कोलाहल मनाला अधिक अस्वस्थ करत आहे. आपण प्रगतीच्या, विज्ञानाच्या गप्पा मारत असलो, तरी विचारांनी मात्र मागे जात आहोत की काय, अशी शंका येऊ लागली आहे. जेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीकडे आज पाहतो, तेव्हा मन विदीर्ण होते.अलिकडच्या काळात आपल्या समाजात वाढणारा धार्मिक उन्माद, वाढती कट्टरता आणि माणसा-माणसांच्या मनात निर्माण होत चाललेले वितुष्ट पाहून साधार भीती वाटू लागली आहे.

धार्मिक उन्माद की भक्तीचा विपर्यास ? असा सवाल उभा ठाकला आहे. भक्तीमध्ये लीन होणे आणि भक्तीचा उन्माद करणे यात खूप फरक आहे. आज धर्म हा माणसाला माणसाशी जोडणारे माध्यम राहण्याऐवजी, माणसाला माणसापासून तोडणारे शस्त्र बनत चालला आहे. सण-उत्सव हे एकत्र येण्यासाठी, सुख-दुःख वाटून घेण्यासाठी असतात. परंतु, आजकाल उत्सवांचे स्वरूप शक्तीप्रदर्शन आणि दुसऱ्या धर्माला किंवा दुसऱ्यांच्या विचाराला कमी लेखण्याचे एक माध्यम बनत चालले आहे.

सोशल मीडियापासून ते गल्लीबोळांपर्यंत कट्टरतेचे जे प्रदर्शन होत आहे, ते पाहून मन सुन्न होते.मनामनातील वाढते वितुष्ट सगळ्यात मोठी चिंता ही आहे की, हे वितुष्ट आता फक्त संघटनांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते लोकांच्या घराघरांमध्ये, मित्रांमध्ये व मनामनांमध्ये शिरले आहे. जात, धर्म आणि पंथाच्या नावावर भिंती इतक्या उंच होत चालल्या आहेत की, पलीकडचा माणूस हा आपलाच एक भाऊ आहे, हे आपण विसरत चाललो आहोत. संवादाची जागा वादाने घेतली आहे आणि समजूतदारपणाची जागा अविचाराने घेतली आहे.

आजच्या काळात समाजाला सर्वात जास्त गरज असेल तर ती सुबुद्धीची.जेव्हा माणसाची विवेकबुद्धी नष्ट होते, तेव्हाच समाजात अमंगळ घडते.म्हणूनच, यंदा निरोप देताना तुझ्या चरणी हेच साकडं आहे. माणसाला माणसासारखे वागण्याची आणि दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आदर करण्याची सुबुद्धी दे.कट्टरतेचे विघ्न हरण कर: मनामनात पेरले गेलेले द्वेषाचे आणि कट्टरतेचे विष नष्ट कर.अमंगळ सोबत घेऊन जा

बाप्पा, आज निरोप घेताना एकच मागणं आहे… आमच्यातील ‘मी’ पणा, धार्मिक कट्टरता, आणि मनामनातील वितुष्ट तुझ्यासोबतच घेऊन जा. पुढच्या वर्षाची वाट पाहूच…पण आज जेव्हा तुमच्या मुर्तीचे विसर्जन होईल, तेव्हा आम्हा सगळ्यांना एकत्र गुण्यागोविंदाने राहण्याची बुद्धी देऊन हे अमंगळ वातावरण तुमच्यासोबतच घेऊन जा. आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आण, आमच्या मनात प्रेमाची पेरणी कर. हे बुद्धीच्या देवा, समाजाला लागलेली अमंगळतेची ही कीड आता सोबतच घेऊन जा !

‘निरोप घेता आज तुझा, डोळे हे ओलावले,पण मागणं एकच देवा, जे मनात रेंगाळले…कट्टरता, उन्माद आणि मनातील तो द्वेष, सोबत घेऊन जा तुझ्या, सुखाचा लाभू दे संदेश.’ हीच तुझ्या चरणी आर्त प्रार्थना !

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular