अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : २०२० मध्ये जेव्हा संपूर्ण जग कोविडसारख्या महामारीचा आणि आर्थिक मंदीचा सामना करत होते.अशा अत्यंत आव्हानात्मक वातावरणात वैयक्तिक पातळीवर व्यवसायात टिकून राहणे आणि प्रगती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले. व्यवसाय क्षेत्रात झपाट्याने बदल होत होते. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक व्यक्तीची व्यवसाय करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचे गुण वेगळे असतात आणि विचारही आगळेवेगळे असतात. या विविधतेचा व्यवसायासाठी सकारात्मक वापर कसा करता येईल या विचाराने अकोल्यातील काही युवकांनी एकत्र येण्याचे ठरवले. ‘एकमेकां साहाय्य करूं, अवघे धरूं सुपंथ’ या उक्तीचा आधार घेत, उच्चशिक्षित आणि महत्त्वाकांक्षी युवकांनी या आव्हानालाच आपली संधी बनविण्याचा विचारातून मारवाड़ी बिजनेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ इंडिया अर्थातच ‘MBF’ उभं केलं.

१ मार्च २०२० रोजी सुरू झालेल्या MBFची संकल्पना केवळ व्यावसायिकांची ओळख वाढवण्यापुरती मर्यादित नव्हती. उद्योजक आणि व्यवसायिकांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकावं, नव्या संधी शोधाव्यात, परस्पर सहकार्य करावं, ज्ञानाची देवाणघेवाण करावी आणि शक्य तिथे पार्टनरशिप, जॉइंट व्हेंचरच्या माध्यमातून एकत्रित प्रगती साधावी, ही त्यामागची भूमिका होती. समाजाला यशाच्या वाटेवर नेणारी ही एक सामाजिक चळवळच झाली.

ही चळवळ व्यापक करण्यासाठी दर महिन्याला मारवाड़ी बिजनेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ इंडिया अर्थातच ‘MBF’ ची दर नियमित बैठका घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अत्यंत लहान स्वरूपात सुरू झालेल्या या चळवळीत हळूहळू इतरही समविचारी सदस्य जोडले गेले. बैठकांमध्ये प्रत्येक जण आपापले अनुभव, व्यवसायीक अडचणी आणि नवनवीन धोरणे उघडपणे मांडू लागला. यामुळे केवळ एकमेकांना शिकायलाच मिळाले नाही, तर एकमेकांबद्दलचा विश्वासही अधिक दृढ होत.विश्वासाची वीण बघता बघता या पूर्णपणे घट्ट झाली.विचारांच्या देवाणघेवाणीतून रचला पाया आता मजबूत झाला. आज या विचाराशी ६० हून अधिक सदस्य जोडले गेलेत. MBF आता आपल्या वाटचालीतील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपलं.
महत्वाचे म्हणजे विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड किती मिळते.तर आज संघटनेच्या माध्यमातून १० मित्रांनी एकत्र येत थेट बांधकाम (Real Estate) क्षेत्रात पाऊल ठेवून एक नवा आदर्श निर्माण केला. या सहा वर्षांत संघात अनेक चढ-उतार आले, पण ‘सामुहिक विकास’ हे एकच ध्येय समोर असल्यामुळे संघटना मजबूत होत गेली. या संघटनेच्या माध्यमातून विचारांची परिपक्वता वाढली आणि त्यातूनच एका मोठ्या व्यावसायिक कल्पनेचा जन्म झाला.

संघटनेतील १० जणांनी एकत्र येऊन केवळ सल्लामसलत न करता, प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायात टिकून राहण्यास भांडवलासोबतच योग्य नियोजनाची आणि मनुष्यबळाची गरज असते. या १० तरुणांनी आपली वेगवेगळी कौशल्ये, आर्थिक ताकद आणि व्यावसायिक अनुभव एकत्र करत थेट बांधकाम क्षेत्रात (Construction & Real Estate) पाऊल ठेवले. बांधकाम क्षेत्र हे अत्यंत जोखमीचे आणि मोठ्या भांडवलाचे मानले जाते. परंतु, या १० जणांच्या सामुहिक शक्तीमुळे ही जोखीम विभागली गेली आणि प्रत्येकाच्या कौशल्याचा योग्य वापर प्रकल्पासाठी होणार आहे. MBFच्या या दहा सदस्यांनी एकत्र येत तब्बल १० कोटी रुपयांचा ‘सहयोग एस्टेट-३’ हा संयुक्त प्रकल्प हाती घेतला आहे. नावातच ‘सहयोग’ असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षातही त्याच भावनेचं प्रतिबिंब आहे. ‘सहयोग एस्टेट-३’ ही केवळ एका प्रकल्पाची सुरुवात नाही. ही एका विचाराची प्रत्यक्ष उभारणी आहे. ‘मी’च्या पलीकडे जाऊन ‘आपण’चा विचार केला, तर संधींचं क्षितिज किती व्यापक होऊ शकतं, याचं हे उदाहरण आहे.

मात्र एक गोष्ट निश्चित आहे, एकत्र येणं ही सुरुवात होती… एकत्र उभं राहणं हा पुढचा टप्पा आहे.आणि एकत्र प्रगती करणं हे MBF चं स्वप्न असून काही दिवसांतच होणा-या ‘सहयोग एस्टेट-३’ च्या भूमिपूजनातून आता कोणी मार्केटिंग सांभाळेल, कोणी फायनान्स, तर कोणी थेट साईटवरील कामाचे नियोजन करणार आहे. केवळ अकोला नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारा पॅटर्न, अकोल्यातील या युवकांनी सुरू केलेला हा प्रयोग आजच्या नवउद्योजकांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. स्पर्धा कितीही जीवघेणी असली, तरी जर प्रामाणिक हेतूने आणि एकजुटीने प्रयत्न केले, तर कोणतेही मोठे ध्येय साध्य करता येते, हे या १० जणांनी दाखवून दिले आहे.

