अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोल्यातील रामनगर परिसरातील होमिओपॅथी व त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण श्यामकुमार अग्रवाल (वय ४६) याच्याविरोधात एका महिला रुग्णाने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक केली आहे. यापूर्वी वर्ष २०२४ मध्ये देखील डॉ. अग्रवालच्या विरोधात एका महिला रूग्णांने लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती.त्यावेळी राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकरण चौकशीसाठी ठेवले आणि अग्रवालला जामीन मिळाला होता. ताज्या अपडेटनुसार या प्रकरणात देखील डॉ.प्रवीण अग्रवाल याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र तोवर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली.
नागपूर येथील रहिवासी असलेली एक पीडित महिला सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास डॉ. प्रवीण अग्रवाल यांच्या म्हाडा कॉलनी, रामनगर येथील अग्रवालच्या क्लिनिकमध्ये ‘हेअर ट्रीटमेंट’ साठी अपॉइंटमेंटनुसार गेली होती. उपचार किंवा हेअर सेटिंग करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने तिच्यासोबत अत्यंत अश्लील वर्तन करून विनयभंग केला.याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अकोल्याच्या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७४ आणि ७५(१)(बी) अंतर्गत गुन्हा क्रमांक ६०९/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल होताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉ. प्रवीण अग्रवाल याला अटक केली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित महिलेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अकोला जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर यांची भेट घेऊन आपली आपबीती सांगितली या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आरोपी डॉक्टरला भररस्त्यात चोप दिला (धुलाई केली) आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून महिला रुग्णांचे आर्थिक व लैंगिक शोषण करत असल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी मे २०२४ मध्येही या डॉक्टरवर एका ३० वर्षीय महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीडितेचे जबाब आणि क्लिनिकमधील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
