सिंहगडावर अमरावती येथील हकनाक तरुण-तरुणींना मारहाण :
अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : सिंहगडावर फिरायला आलेल्या एका कुटुंबातील ८ वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला असल्याच्या कारणाने तिच्या वडिलांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच सिंहगडावर फिरायला आलेल्या काही तरुण-तरुणींना मारहाण करण्यात आली. समस्त हिंदू बांधव आर्मीच्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या तथाकथित आर्मीत असलेल्या तीन मुलींनी महिलांना मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील व्यंकटेश सेरेनिटी भागातील रहिवासी अवधूत पांडुरंग पाटील (वय ३९) आपली पत्नी, मुलगा व पुतण्या अर्णव पाटील तसेच त्यांचे मित्र जोसेफ डिसोझा (रा. मांजरी) हे सिंहगडावर गेले होते.नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या ठिकाणी सर्वांनी भेट दिली. फोटो काढले. तेथून पुढे जात असताना तेथे समस्त हिंदू बांधव आर्मीचे (एसएचबी आर्मी) ७ ते ८ जण तरुण-तरुणी आले. बरमुडा घालून का आलात? येथे फोटो का काढता, खाली जा, असे म्हणाले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना आम्ही जात आहोत, आता तुम्ही आम्हाला मारणार आहात का, असे म्हणाले. त्यावेळी त्यातील तिघे जण पुढे झाले. त्यांनी गालावर चापटीने मारहाण केली. त्यांनी तुम्हाला हिंदु संस्कृती समजत का नाही, असे बोलून दमदाटी केली. ही घटना सिंहगड किल्ल्यावर दुपारी २ ते ५ या वेळेत घडली.अशी तक्रार हवेली पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तातडीने कारवाई करत पोलिसांनी संकेत संजय पाटील, आशिष दिलीप अपार, रेवण नारायण कोकाटे, सायली सुजीत चव्हाण, केतकी सुरज जाधव, अमर रामचंद्र शिर्के, कुणाल किसन नलावडे आणि आर्या प्रवीण कवडे यांना ताब्यात घेतले. फिर्यादीकडून ओळख पटवून दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाण केली जात असताना मध्यस्थी करण्यासाठी आलेले अमरावती येथील खुशबू मिनानाथ बदावणे, करिश्मा मिनानाथ बदावणे, विशाल मनोहर खंडागळे, आदर्श दशरथराव ढेकाळे यांनाही या आर्मीच्या तरुण-तरुणींनी मारहाण केली. फिर्यादी व विशाल खंडागळे यांना संकेत पाटील, अमर शिर्के, कुणाल नलावडे यांनी मारहाण केली होती. त्यांच्या पत्नीस हाताने आर्या कवडे हिने ओढले होते. खुशबू बदावणे हिला सायली चव्हाण, केतकी जाधव यांनी मारहाण केली होती.

सिंहगडावर फिरायला आलेल्या कुटुंबातील ८ वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला होता. त्यावरून तिच्या वडिलांना मारहाण केली, तसेच इतर तरुणतरुणींना चक्क मारहाण केली असल्याने आता असे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार दिमागी नक्षल या नवीन व्याख्येत बसणारा असून कोणी काय खावं, काय पेहराव करावा, कुठे कसं जायचं याचा भारतीय संविधानाने संपूर्ण अधिकार दिला आहे. पण हिंदू धर्माच्या नावाखाली ही गुंडगिरी खपवून घेणार काय ? असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होत आहे. हवेली पोलिसांनी सर्वाना पकडून आणले असले तरी या प्रकरणामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.