अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : Sugar Jaggery Price Hike : आगामी सण-उत्सवांच्या तोंडावरच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची मोठी झळ बसणार आहे.फक्त १५ दिवसांत साखरेच्या दरात तब्बल १७ तर गुळाच्या दरात ४० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणामुळे आणि साखरेच्या उपलब्धतेवरील दबावामुळे ही दरवाढ झाली आहे असं बोललं जात आहे.

जागतिक परिस्थितीतील उलथापालथामुळे महागाईने डोकंवर तर केलं आहे. पण आता या सगळ्यात मध्येच साखरेचे दर अचानक वाढले आहे. कालपर्यंत लोक सहजपणे एक-दोन किलो विकत घेऊन घरी आणू शकत असलेल्या साखरेच्या किमतीने अचानक स्वयंपाकघरातील सामानाची व्यवस्था बिघडवली आहे. गेल्या १५ दिवसांत साखर प्रति किलो सुमारे १७ रुपयांनी, तर गूळ जवळपास ४० रुपयांनी महाग झाला आहे.
सणासुदीच्या तोंडावर ही झालेली वाढ सामान्यांच्या खिशाला अजून फाटका करणारी आहे. त्यामुळे परिणामी, घरगुती चहापासून ते चॉकलेट, दूध, खीर, ज्यूस आणि मिठाईपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये महागाईचे परिणाम दिसून येत आहेत. या सगळ्याला कारण केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणामुळे आणि साखरेच्या उपलब्धतेवरील दबावामुळे ही दरवाढ झाली आहे असं बोललं जात आहे. नेमकं काय कारण आहे? सणासुदीच्या आधी सामान्यांच्या खिशाला कसा झटका लागत आहे आणि पुढे काय होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
वाढत्या किमतींमुळे बाजारात भितीचं वातावरण
साखर व गुळाच्या वाढत्या किमतींमुळे बाजारात भितीचं वातावरण पसरवत आहे. सामान्य नागरिक आणि व्यावसायिक या दोघांमध्येही चिंता वाढली आहे. यामुळे काळाबाजार वाढण्याची भीती आहे. काही व्यावसायिकांनी सरकारला साखर व गुळाच्या किमती तात्काळ नियंत्रित करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा दिवाळीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्या आणि नवीन दरांमध्ये लक्षणीय तफावत
साखरेसोबतच गुळाच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे घरगुती बजेटमध्येही अडथळा निर्माण झाला आहे. थोक विक्रेता प्रवीण गोयल यांच्या मते, १५ दिवसांपूर्वी गुळाचा भाव ६० रुपये प्रति किलो होता, पण आज तो १०० रुपये प्रति किलोपर्यंत उपलब्ध आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी साखरेचा भाव ४८ रुपये प्रति किलो होता.पण आता त्याचा भाव ६२ ते ६५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. इतकेच नाही तर, महिन्याभरापूर्वी ९०० रुपये प्रति किलो दराने मिळणारे बदाम आता १,१०० रुपये प्रति किलोपर्यंत मिळत आहेत. यामुळे मिठाईची दुकाने, चहाची दुकाने, कन्फेक्शनरी, बेकरी आणि अन्न उत्पादक यांसारख्या लहान व्यवसायांचा खर्च वाढेल.
साखरेचे भाव का वाढत आहेत?
एका घाऊक साखर व्यापाऱ्याने सांगितले की, यावर्षी देशात ३,२०,००० टन साखरेचे उत्पादन अपेक्षित होते, परंतु केवळ २,८०,००० टन उत्पादन झाले आहे. साखर इतर देशांमध्ये निर्यातही केली जात होती, परंतु वाढत्या महागाईमुळे साखरेची निर्यात सध्या थांबवण्यात आली आहे. असे असूनही, साखरेच्या दरात घट झालेली नाही. व्यापाऱ्यांचा दावा आहे की, गेल्या दोन महिन्यांत घाऊक बाजारात साखरेचा भाव सुमारे १५ रुपयांनी वाढला आहे. सरकारने १ ऑगस्टपासून साठ्यावर मर्यादाही घातली आहे. घाऊक व्यापारी आता ३० दिवसांत ४,००० क्विंटल साखर विकू शकतील. महागाईमध्ये इथेनॉलचाही वाटा असल्याचे मानले जाते.