अकोल्यात प्रथमतः महसूल व भूमी अभिलेख विषयक तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोल्यात प्रथमच महसूल व भूमी अभिलेख विषयक तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी परिसरात नियोजन भवन येथे भूमी अभिलेख विभाग व महसूल विभाग यांच्या सहकार्याने तसेच ACCE इंडिया व अकोला NAREDCO आणि Institute of Indian Architects (IIA), अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला अकोला, खामगाव, मूर्तिजापूर, अकोट, वाशिम, बुलढाणा, कारंजा, पातूर आदी शहरांमधून १५५ हून अधिक अभियंते, वास्तुविशारद तसेच संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेपूर्वी आयोजकांनी महसूल व भूमी अभिलेख विभागाशी संबंधित प्रत्यक्ष कामकाजातील विविध अडचणी, त्यावरील संभाव्य उपाययोजना, त्यातून होणारे फायदे तसेच समस्या सोडविण्याची कार्यपद्धतीचा सविस्तर तक्ता तयार करून अधिकाऱ्यांना सादर केला.यामाध्यमातून क्षेत्रातील अभियंते, वास्तुविशारद व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी या समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन करत अनेक बाबींचे निराकरण कसे करता येईल, हे स्पष्ट केले. त्यामुळे कार्यशाळा केवळ माहितीपर न राहता ‘समस्या–उपाय–अंमलबजावणी’ या त्रिसूत्रीवर आधारित ठरली.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार साजिद खान पठाण यांनी महसूल व भूमी अभिलेखाशी संबंधित विविध कामांसाठी प्रमाणित, भविष्यात विशेष शिबिरांच्या माध्यमातून ‘ब’ वर्ग जमिनीचे ‘अ’ वर्गीकरण कारण्यासाठी पारदर्शक व सुलभ कार्यपद्धती तयार करण्याची गरज व्यक्त केली.

अमरावती विभाग भूमी अभिलेख उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी भूमी अभिलेखांच्या डिजिटायझेशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. अकोला भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल यांनी विविध ऑनलाइन प्रणालींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

महसूल उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार यांनी फेरफार नोंदी तसेच जमिनीचा धारणाधिकार बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. अकोला तालुका भुमि अभिलेख उपअधीक्षक सिध्देश्वर घुले यांनी निर्दोष व अचूक भूमी अभिलेख निर्मितीस कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी विशाल काटोले यांनी ऑनलाइन महसूल प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली.

विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा : कार्यशाळेत ‘ब’ वर्ग जमिनीचे ‘अ’ वर्गीकरण / वर्गबदल, एका प्रॉपर्टी कार्डत अनेक खाते उतारे अथवा गठ्ठा मालमत्ता पत्रकांचा समावेश असलेल्या प्रकरणांचे वर्गीकरण करून प्रत्येक मालमत्तेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करणे, सदनिकाधारकांनाही Vertical Property Card उपलब्ध करून देणे तसेच मोजणी प्रक्रियेतील अडचणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या विषयांबाबत अभियंते, वास्तुविशारद व नागरिकांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यात विशेष शिबिरे आयोजित करून ‘ब’ वर्ग जमिनीचे ‘अ’ वर्गीकरण / वर्गबदल तसेच इतर प्रलंबित विषयांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्याचे आश्वासन दिले. यामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्यासोबतच नागरिक, अभियंते व वास्तुविशारदांना कार्यालयीन फेऱ्या, वेळ व अनावश्यक विलंब कमी करण्यास मदत होणार आहे.

प्रश्नोत्तर सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यशाळेतील प्रश्नोत्तर सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित अभियंते, वास्तुविशारद आणि संबंधित व्यावसायिकांनी महसूल व भूमी अभिलेखाशी संबंधित विविध प्रत्यक्ष अडचणी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे समाधानकारक निरसन करत प्रत्येक विषयाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन पद्धत आणि पुढील कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे प्रशासन आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यात थेट संवादाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले. शासनाच्या ऑनलाइन प्रणालींचा अधिक प्रभावी वापर, भूमी अभिलेखांमध्ये अचूकता, फेरफार प्रक्रियेत सुलभता आणि नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.

यावेळी मुख्य संयोजक व नारेडको महाराष्ट्र सहसचिव इंजी.पंकज कोठारी यांनी सांगितले की, “महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि नागरिक—या तिन्ही घटकांना एकाच व्यासपीठावर आणणे हे निश्चितच आव्हानात्मक होते. मात्र, या कार्यशाळेच्या माध्यमातून ते यशस्वीपणे साध्य झाले आहे. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, अभियंते, वास्तुविशारद व सहभागी संस्थांचे सहसंयोजक इंजी. प्रो. इस्माईल नाजमी व इंजी. मकरंद पांडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन इंजी. अनुराग अग्रवाल यांनी केले. कार्यशाळेस ACCE Akolaचे चेअरमन अभिजीत परांजपे, सचिव श्याम ठाकूर, कोषाध्यक्ष संजय भगत, माजी चेअरमन अजय लोहिया,शाम साधवानी, शेखर मुखेडकर, रिझवान कुरेशी, मयूर सिंघानिया, इंद्रनील देशमुख,नरेश अग्रवाल, कुशल जैन व विशाल तड़स यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच NAREDCO Akola चे अध्यक्ष सुनील इन्नानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मालानी, अविनाश राऊत व कोषाध्यक्ष अक्षय ठोकळ, संजय तुलशान आणि IIA Akola चे चेअरमन आर्कि मनीष भुतडा, सचिव सर्वेश केला, कोषाध्यक्ष हर्शल वाकोडे, सुमित अग्रवाल, ईश्वर आनंदानी,जगदीश काबरा, मनोज मोदी, जयप्रकाश राठी यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

महसूल व भूमी अभिलेखाशी संबंधित प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी प्रशासन व तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये भविष्यातही अशाच प्रकारचा सातत्यपूर्ण संवाद राहावा, तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here