अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : पर्यावरण संवर्धन व प्लास्टिकमुक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील नागरिकांना १ हजार कापडी पिशव्यांचे वाटप अकोला अर्बन बँकतर्फे करण्यात आले.पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्यास नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

शहरातील श्रीवास्तव चौक,जठारपेठ आणि तुकाराम चौक या तीन ठिकाणी एकाच वेळी कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून नागरिकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमाला बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी सपत्निक उपस्थित होते. तसेच बँकेचे उपाध्यक्ष राहुल राठी, संचालक राहुल गोयनका, कैलास मशानकर यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पर्यावरण संरक्षण गतीविधीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार; पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाचा सहभाग! या संदेशाने अकोला अर्बन बँकेच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक आदर्श निर्माण केला.