उत्सव खवय्येगिरीचा ! पावसाळी रानमेवा उत्सव ६ सप्टेंबरला

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे औचित्य साधून, लोप पावत चाललेल्या रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचे पौष्टिक महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे व पारंपरिक खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने टीम वन:शाकम व माहेश्वरी महिला मंडळ आणि इनरव्हील क्लब ऑफ अकोला क्वीन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पावसाळी रानमेवा : उत्सव खवय्येगिरीचा’ या अनोख्या खाद्य महोत्सवाचे आयोजन रविवार, दि.६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लोकमान्य टिळक सभागृह, न्यू इंग्लिश कॅम्पस, जिल्हा न्यायालयासमोर, अकोला येथे करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवात रानभाज्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पारंपरिक, पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. रानभाज्यांचा पौष्टिक नाश्ता, जेवण तसेच रानमेव्यापासून बनविलेले विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. रानभाज्यांपासून स्वादिष्ट पदार्थ तयार करणाऱ्या महिला, गृहिणी, बचत गट, खाद्यउद्योजक आणि खाद्यप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुकांना स्टॉल पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाककला व पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा परिचय खवैय्यापर्यंत पोहोचविण्याची ही उत्तम संधी असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टीम वन:शाकमच्या मानद सचिव व इनरव्हील क्लब ऑफ अकोला क्वीन्सच्या अध्यक्षा पल्लवी दिवेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यावेळी चार्टर प्रेसिडेंट प्रियांका पडगीलवार यांनी सांगितले की, गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल.. रानभाज्यांचे जतन, स्थानिक खाद्यसंस्कृतीचा प्रचार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे. टीम वन:शाकमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना चांडक आणि माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना हेडा यांनी आवाहन केले की, कुटुंबीय, मित्र-परिवारासह या खाद्य महोत्सवाला अवश्य भेट द्यावी. संपर्कासाठी : डॉ. नीलिमा टिंगरे : 8010398197, जयेश लगड़ : 9370058050

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here