अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : जगात झपाट्याने बदलत चाललेल्या व्यवस्थेतून शिक्षणक्षेत्रही सुटलेले नाही तर उलट अधिक स्पर्धात्मक वातावरणामुळे पालकांना मोठा आर्थिक तर विद्यार्थ्यांना बौद्धिक संघर्ष करावा लागत असतानाच नीट परीक्षेचा पेपरफुटीने लाखो पालक आणि विद्यार्थ्यांप्रमाणे मानसिक धक्का बसला. मला व माझ्या सारख्यांना हा प्रकार असह्य होता. तेव्हा दिवसरात्र मेहनत घेऊन जय्यत तयारी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मनोदशेचं काय? अकोला शहरातील अनेक निकटवर्तीय नातेवाईक, मित्र आणि स्नेही जणांचे पाल्य पुढे काय ? या विचाराने वेगळाच मानसिक ताण तणावात असताना, फेर परिक्षा जाहीर झाली. तेव्हा झाले गेले गंगेला मिळाले, याप्रमाणे फेरपरीक्षासाठी सरावाला सुरुवात केली आणि काल जाहीर झालेल्या निकालात, अकोला शहरातील विद्यार्थ्यांनी ‘निट’ परिक्षेत अलौकिक यशाला गवसणी घातली. हे दिसून आले. पण रद्द झालेल्या परिक्षेत यापेक्षा जास्त गुण मिळाले असते, असं अनेकांनी बोलून दाखवीले.

अकोला जिल्ह्यातील ठोक औषध विक्रेता उमेश कोठारी यांचा नातू आणि प्रफुल्ल कोठारी यांचा मुलगा केशव कोठारी याने गुणवत्ता यादीत देशपातळीवर ४,१५४ वे स्थान पटकाविले. केशवने ६२५ गुण मिळवून हे यश संपादन केले आहे.नीट परीक्षेत मला ६२५ गुण मिळाले. त्यामुळे मी खूप आनंदित आहे. मात्र, रद्द झालेल्या परिक्षेत निश्चितच यापेक्षा जास्त गुण मिळाले असते.अशी खंतही त्याने व्यक्त केली.काही काळ मीसुद्धा अस्वस्थ झालो. परंतु मी ठरवले की जे झाले ते विसरून जायचं अन् जीव ओतून तयारीला लागलो.
माझे कुटुंब मध्यमवर्गीय असून आपली काहीही चुक नसताना पुन्हा परिक्षा देण्याची वेळ आल्याने एक वेगळंच दडपण होते. मात्र आजोबा आणि आजी शोभा तसेच वडील व आई पूनम यांनी ही संधी आहे आणि संधीचे सोने केले पाहिजे, असं पटवून दिल्यानंतर नव्या जोमाने तयारीला लागलो, असं केशवने सांगितलं. इयत्ता १० वीच्या परिक्षेत केशवचे गुणवत्ता श्रेणीतील स्थान, गुण आणि दहावीच्या निकालानंतरच नीट परिक्षेसाठी घेतलेले परिश्रम बघता, हे यश बरेच काही सांगून जाते. एक मात्र खरं की, केशवने घेतलेली भरारी प्रेरणादायी आहे.
पश्चिम विदर्भातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. एम.एम राठी आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सरोज राठी यांचा नातू तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ अनुप राठी व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. भारती राठी यांचा मुलगा अनय राठी याने गुणवत्ता यादीत झळकण्याची राठी कुटुंबाची परंपरा कायम राखली.नीट परिक्षा गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या अनयने देखील परफुटीच्या गोंधळामुळे परीक्षा रद्द होऊन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णयाने काहीसं नैराश्य आले होते.असं सांगितले परंतु मी अजिबात दडपण घेतले नाही आणि स्वतःला सांगितले की, ‘न डगमगता पुन्हा एकदा मैदानात उतरायचे !’. मी अभ्यासाची लय कायम ठेवली आणि नव्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन केले. अनपेक्षित उद्भवलेल्या या प्रकरणात आजोबा आजी आणि आई वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन महत्त्वाचं ठरले आहे.
नीट परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवून पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर होण्याची स्वप्नपूर्ती करण्याकडे समायरा हेडा हिने यशस्वी झेप घेतली.पेपरफुटीने काहीसं नैराश्य आले होते.असं सांगता समायरा म्हणाली की, सर्वस्व पणाला लावून दिलेली परिक्षा रद्द होणे, धक्कादायक बाब आहे. तेव्हा मोबाइल व सोशल मीडियापासून लांब राहिले. घरातून नेहमीच अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळाले. कधीही माझ्यावर गुणांचे दडपण आणले नाही. त्यामुळे पेपरफुटीचा जास्त विचार न करता पुन्हा परिक्षेला सामोरे जाऊन आपले स्वप्न साकार करण्याची पहिली पायरी ओलांडली. विदर्भातील दंतशल्य चिकित्सक क्षेत्रातील भिष्मपिता आणि अकोला शहर व ग्रामीण भागात चिरपरिचित डॉ.आर.बी.हेडा यांची नात आणि दंत आरोग्य व रूट कॅनल तज्ज्ञ डॉ. अमित व डॉ.पुजा हेडा यांची मुलगी समायरा हिने मिळविलेले यश वाखाणण्याजोगी आहे.

अकोला शहरातील कोठारी-राठी-हेडा आणि अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने फेर परिक्षेत अलौकिक यशाला गवसणी घातली असली तरी दररोज १३ ते १४ तासांचा अभ्यास. वेळेचे काटेकोर नियोजन.सातत्याने प्रश्नपत्रिकांचा सराव व स्वतःच्या चुका शोधून त्यात केलेली सुधारणा. त्याचसोबत मी स्वतःच्या अभ्यासावर म्हणजेच ‘सेल्फ स्टडी’वर सर्वाधिक भर, नियमित उजळणी आणि सततच्या सरावामुळे तयारी अधिक भक्कम करून दिलेली परिक्षा रद्द होणे आणि पुन्हा फेर परिक्षा देण्याची वेळ आल्याने निश्चितच मनावर मोठे दडपण येते. ही बाब सरकार नावाच्या यंत्रणेने लक्षात घेऊन येत्या काळात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये, एवढी अपेक्षा जर पालक आणि पाल्य ठेवून असेल तर त्यात गैर काय ?
