अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : वैद्यकीय कामासाठी हात उसनवारी करून घेतलेली रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश बॅंकेतून न वटविता परत आल्याने एन.आय.कायद्याच्या कलम 138 अन्वये आरोपी अरुण शिवलकर याला दोषी ठरवून अतिरिक्त ४ थे मुख्य दंडाधिकारी दिवाकर फुलझले यांनी १ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा ठोठावत धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले. यासोबतच आरोपीच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आला. तक्रारकर्त्याची बाजू अँड पवनेश अग्रवाल यांनी जोरकसपणे मांडली.

प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की अकोला मोठी उमरी येथील रहिवासी अरुण दिगंबर शिवलकर याने अकोला येथील शिवाजी नगरात राहणारा संजय गणेश यांच्याकडून तातडीच्या वैद्यकीय कामासाठी २३ डिसेंबर २०२३ रोजी रोख ३० हजार रुपये हातकर्ज घेतले होते. हातकर्जाची रक्कम परत देण्यास आरोपीने कोटक महिंद्रा बँकेचा चेक क्रमांक ००००३८ दिनांक ३० २० फेब्रुवारी २०२४ चा रूपये ३० हजाराचा चेक दिला. त्यानंतर २६ एप्रिल २०२४ रोजी तक्रारदाराने चेक बँकेत जमा केला, परंतु २६ एप्रिल २०२४ रोजी चेक न वटविता परत आला. रिटर्न मेमोत स्पष्ट नमूद केले आहे की, चेक काढणाऱ्याची सही वेगळी आहे. या कारणास्तव चेक न वटविता, नाकारलेला म्हणून परत करण्यात आला.

त्यानंतर, तक्रारदाराने दि. १८ में २०२४ रोजी आरोपीला कायदेशीर नोटीस बजावली. नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत चेकची रक्कम देण्याची मागणी केली. आरोपीला नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत चेकची रक्कम दिली नाही. त्यामुळे, तक्रारदाराने एन.आय. कायद्याच्या कलम १३८ अन्वये आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणात आरोपी वकिलामार्फत हजर झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे सर्व आरोप नाकारले आणि खटला चालवण्याची मागणी केली. न्यायालयात स्वतः फिर्यादीने स्वतःची साक्ष दिली. फिर्यादीची उलटतपासणी करण्यात आली. फिर्यादीने पुरवणी दाखल केली आणि पुरावा बंद केला.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत आरोपीचा जबाब वगळण्यात आला.दोन्ही बाजूंनी सादर केलेले कागदपत्रे, साक्षिपुरावे तपासून आणि युक्तिवाद ऐकून आरोपीने एन.आय. कायद्याच्या कलम ११८ आणि १३९ अन्वये असलेले अनुमान खोडून काढलेले नाही. याउलट तक्रारदाराने कलम १३८ मधील तरतुदी सिद्ध केल्या. आरोपीने चेक दिला होता. तो बाऊन्स झाला आणि आरोपीला नोटीस बजावून चेकच्या रकमेची मागणी केली, परंतु आरोपी नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत चेकची रक्कम देण्यास अयशस्वी ठरला. आरोपी एन.आय. कायद्याच्या कलम १३८ अन्वये दोषी आढळला आहे.असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. शिक्षेच्या मुद्द्यावर आरोपीचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे, परंतु संधी देऊनही आरोपी गैरहजर राहिला. निष्कर्ष आणि कारणांच्या आधारे दोषसिद्धीस पात्र असल्याचे नमूद करून न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २५५(२) अन्वये, परक्राम्य दस्तऐवज अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून अरुण शिवलकर याला १ वर्षाच्या सक्त कारावासाची आणि चेकच्या रकमेच्या दुप्पट म्हणजेच ६० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपीला तुरुंगात पाठवण्यासाठी अटक वॉरंट जारी केले.
या प्रकरणातील तक्रारदार संजय इचे यांनी मानवी मूल्यांचे जतन करण्याचा हेतूने आरोपीला पैसे दिले. मात्र अरुण शिवलकर याने गैरफायदा घेतला. या प्रकरणात अँड पवनेश अग्रवाल यांनी दिड वर्षात संजय इचे यांना दिलासा मिळवून दिला.
