अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण आणि सोडविण्यासाठी गठीत भारतीय जनता पार्टी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेलच्या संयोजकपदी जिल्हा परिषदेचे अधिकारी सुनील जानोरकर तर सहसंयोजक म्हणून जिल्हा परिषद सेवानिवृत्त अधिकारी व जनसंपर्क अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रदीप खाडे, तसेच सरचिटणीसपदी राजेंद्र नेरकर आणि कोषाध्यक्षपदी अशोक मांगुळकर यांची नियुक्त करण्यात आली. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकारीणी येत्या दिवसात घोषित करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


महाराष्ट्र विधानमंडळात भाजपाचे मुख्य प्रतोद आ.आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या भाजपा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेलने आपल्या कार्याला सुरुवात केली असून आतापर्यंत विविध विभागांमधील 25 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावून न्याय मिळवून दिला आहे.या सेलकडे सर्वच विभागातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या रोज येत आहेत. प्राप्त सर्व समस्यांचा अभ्यास व शासकीय परिपत्रकांचे आकलन करून त्या सोडविण्यास्तव कार्यवाही करण्यात येत आहे. शासनस्तरावरील समस्या सोडविण्यासाठी आमदार सावरकर यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
एकंदरीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा व विश्वसनीय आधार मिळाला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या सेलचे स्वागत करून त्यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह आपल्या समस्यांबाबत या सेलशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
