Sunday, July 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeवाशिम चेक बाऊन्स प्रकरण ! आरोपीला ३ महिन्यांचा कारावास

वाशिम चेक बाऊन्स प्रकरण ! आरोपीला ३ महिन्यांचा कारावास

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : घरच्या कामासाठी घेतलेल्या २ लाख रुपयांच्या हातउसण्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश बँकेत पुरेशा रकमेअभावी चेक बाऊन्स झाल्या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवून ३ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच फिर्यादीला दोन महिन्यात ३ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी व रक्कम दिली नाही तर आरोपीला अतिरिक्त ३ महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला.

वाशिम येथील श्यामराव तुळशीराम ढोबळे (४८) आणि वाशिम लाखाळा येथीलच सुधाकर सुरुशे (४५) यांच्यात कौटुंबिक व स्नेहाचे संबंध होते. याच परिचयातून आरोपी सुधाकर सुरुशे याने घराच्या कामासाठी एप्रिल २०२२ मध्ये फिर्यादीकडे २ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार श्यामराव ढोबळे यांनी २५ एप्रिल २०२२ रोजी आरोपीला २ लाख रुपये नगदी आणि बिनव्याजी हातउसणे म्हणून दिले होते. ही रक्कम दोन महिन्यांत परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते.

​मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न केल्याने फिर्यादीने तगादा लावला. तेव्हा आरोपी सुरूशे याने पुसद अर्बन बँक वाशिम शाखेचा २ लाख रुपयांचा धनादेश फिर्यादीच्या नावाने लिहून दिला. धनादेश २ जुलै २०२२ रोजी बँकेत वटवण्यासाठी दिला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो अनादरित होऊन परत आला. यानंतर फिर्यादीने आपले वकील ॲड. अमोल उर्फ गुड्डू सोमाणी यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपीने पैसे न दिल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली.

​न्यायालयात तब्बल ३ वर्षे, १० महिने आणि ५ दिवस हा खटला चालला. सुनावणीदरम्यान आरोपीने ‘आपले चेक दुकानातून चोरीला गेले होते’ असा बचाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयात तो सिद्ध होऊ शकला नाही.
सन्माननीय न्यायाधीश एस. बी. ढेंबरे यांनी ​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे पडताळून पाहिल्यानंतर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र. २ चे सन्माननीय न्यायाधीश एस.बी.ढेंबरे यांनी ३ जुलै २०२६ रोजी या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. न्यायालयाने आरोपी सुधाकर सुरुशे याला ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट’च्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली. यामध्ये आरोपीला तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फिर्यादीला दोन महिन्यांच्या आत ३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जर आरोपीने ही नुकसान भरपाईची रक्कम विहित मुदतीत दिली नाही, तर त्याला आणखी ३ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!