अकोला दिव्य न्यूज : अधिक मास आणि एकादशीच्या पवित्र पर्वावर धार्मिक स्नानासाठी गेलेल्या माय-लेकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना समशेरपूर येथे घडली. आज गुरुवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी आईने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली; मात्र नियतीने दोघांनाही कायमचे हिरावून नेले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वृषाली हरिदास खोत (वय ३५) आणि स्वराज हरिदास खोत (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त धार्मिक स्नानासाठी समशेरपूर येथील पाच ते सहा महिला गावालगत असलेल्या काटेपूर्णा नदीवर गेले होते. यात वृषाली खोत आणि त्यांचा मुलगा स्वराजही होता. पहाटेची वेळ असल्याने स्नानास उतरलेल्या स्वराजला नदीच्या पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. तो अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडू लागला. आपल्या लेकराचा जीव धोक्यात असल्याचे पाहताच आई वृषाली खोत यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी मारली.
वाचवण्यासाठी नदीत उरलेल्या दोघीही पाण्यात अडकल्या
मात्र, दुर्दैवाने आई आणि मुलगा दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या प्रवाहात अडकले. आपल्या समोर घडणारा हा थरारक प्रसंग पाहून त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांनीही मदतीसाठी नदीत उडी घेतली. परंतु त्या दोघीही पाण्यात अडकल्या.आरडाओरडा ऐकताच नदीकाठी उपस्थित असलेल्या काही युवकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नदीत उड्या घेतल्या. मोठ्या शर्थीने त्यांनी माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र वृषाली खोत आणि स्वराज खोत हे बुडाले.अथक शोधमोहीमेनंतर माय-लेकाचे मृतदेह नदीत आढळून आले. या घटनेत बचावलेल्या महिलांना उपचारासाठी अकोला येथे भरती करण्यात आले आहे.

आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने क्षणाचाही विचार न करता मृत्यूच्या पाण्यात उडी घेतली. पण नियतीसमोर तिची ममता आणि संघर्ष अपुरा ठरला. आई आणि मुलाचा एकाच वेळी झालेला मृत्यू पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेने समशेरपूरसह संपूर्ण परिसर गहिवरून गेला आहे.
