Saturday, June 6, 2026
No menu items!
No menu items!
Homeइंटरनेटवरील 15 सेकंदाच्या VIDEO तील 'तो' हसणारा मुलगा जळगावचा

इंटरनेटवरील 15 सेकंदाच्या VIDEO तील ‘तो’ हसणारा मुलगा जळगावचा

अकोला दिव्य न्यूज : सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असलेल्या असंख्य व्हिडिओ काही दिवसांनी विस्मरणातही जातात. मात्र हातात चहाचा छोटासा कप, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यांतून झळकणारा आनंद…अवघ्या १५ सेकंदांच्या व्हिडिओमुळे जगभर प्रसिद्ध झालेला अरुणकुमार हा असाच एक चेहरा आहे. इंटरनेटवरील लाखो लोक त्याला ‘हसणारा मुलगा’ म्हणून ओळखतात. मात्र त्याच्या हास्यामागे संघर्ष, गरिबी, शिक्षणासाठीची झुंज आणि एका गुरूने घडविलेली आयुष्य बदलणारी कहाणी दडलेली आहे.

संग्रहित छायाचित्र

तेलंगणातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अरुणकुमारचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबात शिक्षण हा अनेकदा दुय्यम विषय ठरतो. अरुणच्या बाबतीतही तेच घडले. अवघ्या दहाव्या वर्षी चौथी इयत्तेत असतानाच त्याला शाळा सोडावी लागली. वर्गातील बाक, शाळेचे मैदान, मित्रांचा सहवास आणि शिक्षणाची स्वप्ने एका क्षणात मागे पडली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम शोधणे हीच त्याची प्राथमिकता बनली.

लहान वयातच जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या अरुणला नेहरू नावाच्या जळगाव येथील ट्रक चालकाने मदतीचा हात देत त्याला ट्रकवर क्लिनरचे काम दिले. ट्रकची साफसफाई, सामानाची देखरेख, चालकाला मदत करणे आणि दिवस-रात्र रस्त्यावर राहणे, हेच त्याचे आयुष्य बनले. त्यावेळी कदाचित त्यालाही कल्पना नव्हती की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल याच काळात घडणार आहे.

आणि अरुणकुमार प्रसिद्ध झाला
एकदा दुपारी नेहमीप्रमाणे चहा पिताना अरुण कुठल्या तरी विनोदावर खळखळून हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद इतका नैसर्गिक होता की ट्रक मालक नेहरू यांनी तो क्षण मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आणि काही तासांतच तो इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला. लाखो लोकांनी तो पाहिला, शेअर केला आणि त्या निरागस हास्यावर प्रेम व्यक्त केले. काही दिवसांतच अरुण जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या ओळखीचा चेहरा बनला. कॉमेडी पोस्ट, मजेदार प्रसंग आणि मीम्समध्ये त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला.

जगभरातील लोकांना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आवडू लागला. मात्र या प्रसिद्धीच्या मागे एक कटू वास्तव लपलेले होते. ज्या मुलाच्या हास्याचे लाखो लोक कौतुक करत होते, त्यालाच स्वतःबद्दल लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचता येत नव्हत्या. कारण शिक्षणापासून तो अनेक वर्षे दूर राहिला होता.

रस्त्यांवर धावणारा ट्रक बनला शाळा
इंटरनेटसाठी अरुणकुमार हा केवळ एक व्हायरल मीम होता. परंतु ट्रक मालक नेहरू यांच्यासाठी तो त्यापेक्षा खूप मोठा होता. नेहरू यांनी स्वतःही गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यामुळे अरुणचे भविष्यही त्याच अंधारात हरवू नये, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांनी केवळ मालकाची भूमिका निभावली नाही, तर शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकाची जबाबदारी स्वीकारली. अरुणला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी निर्धार केला. पुस्तकांपासून ते परीक्षेच्या शुल्कापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला. शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अरुणला बाह्य विद्यार्थी म्हणून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. दिवसाचे काम संपल्यानंतर किंवा प्रवासादरम्यान ट्रकची केबिनच त्यांची वर्गखोली बनत असे. लांब पल्ल्याच्या प्रवासात नेहरू त्याला अक्षर ओळख शिकवत. गणिताची उदाहरणे सोडवत. वाचन आणि लेखनाचा सराव करून घेत. रस्त्यांवर धावणारा ट्रक एका अर्थाने फिरती शाळाच बनला होता. अनेक वर्षांचा शैक्षणिक खंड भरून काढणे हे सोपे काम नव्हते. पण अरुणने हार मानली नाही.

इन्स्टाग्रामवर लाखो चाहते
दरम्यान, अरुणकुमारची सोशल मीडियावरील लोकप्रियता वाढतच होती. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो चाहते तयार झाले. आज @mr_laddu_0009 या खात्याला पाच लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा शिक्षणाला महत्त्व देण्याचा त्याचा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरला. अखेर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने दहावीची परीक्षा दिली. निकालाचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. कारण त्याच्या नावासमोर ‘उत्तीर्ण’ हा शब्द झळकत होता. चौथीनंतर शिक्षण सोडलेल्या एका मुलासाठी हे यश असामान्य होते. त्याने केवळ परीक्षा पास केली नव्हती, तर परिस्थितीत बदल करून जीवनाला नवीन आयाम दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!