Friday, June 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात आजवरचा सर्वात मोठा भू-घोटाळा ! कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी कार्डांमध्ये केली हेराफेरी...

अकोल्यात आजवरचा सर्वात मोठा भू-घोटाळा ! कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी कार्डांमध्ये केली हेराफेरी !

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा भुमि अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक पंकज पवार यांचा गैरव्यवहाराचा इतिहास जुना असून अकोला येथेही त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी कार्डांमध्ये हेराफेरी करून महसूल विभागाला चक्क ‘सोन्याची अंडी देणारे’ कार्यालय बनविले. विशेष म्हणजे सार्वजनिक सुविधेच्या जमिनींचे कथित गैरव्यवहार आणि चुकीच्या पद्धतीने सत्ता प्रकारातील बदल केल्याचेही समोर आले आहे. विदर्भातील भुमि अभिलेख विभागातील हा आजवरचा घोटाळ्यात अकोला भुमि अभिलेख कार्यालयात पंकज पवार यांनी केलेला घोटाळा सगळ्यात मोठा घोटाळा ठरला आहे.

अकोला जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागात तब्बल चौदाशे प्रॉपर्टी कार्डांमध्ये झालेल्या हेराफेरीच्या गंभीर प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून अनेका मालमत्ता धारकांचा जीव टांगणीला लागला की, आपल्या प्रापर्टी कार्डात हेराफेरी झाली नाही ना ! ही बाब धक्कादायक असली तरी अतिशय गंभीर आहे.मोठ्या आणि वजनदार नेत्याचा वरदहस्त असल्याशिवाय पवार हे धाडस करणार काय ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचे अड्डे उखडून टाकण्यासाठी ही कारवाई पुरेशी आहे का, हा प्रश्न कायम आहे.

अकोला येथील तब्बल चौदाशे प्रॉपर्टी कार्डातील हेराफेरी व कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांवर शिक्कामोर्तब झालेले असताना या घोटाळ्यात कोण कोण, कसे सहभागी आहेत. हे देखील उघड झाले पाहिजे. यात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई होणे हीच काळाची गरज आहे आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पवार याला भूमि अभिलेख  खात्यातून कायमचे बडतर्फ करणार काय ?

अकोला जिल्हा भुमि अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक पदावर पंकज पवार १ जून २०२३ पासून कार्यरत झाले.या कार्यकाळात महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींना धाब्यावर बसवून अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन नवनवीन प्रॉपर्टी कार्डे तयार करणे, परवानगीवीना सामिलीकरणाच्या नोंदी घेणे, क्षेत्रफळांमध्ये फेरफार करणे,अकृषक आकारणी व गुंठेवारी नियम मोडीत काढणे अशा अनेक बेकायदेशीर कारवाया उघड झाल्या आहेत.नोंदी घेताना कोणतीही मोजणी न करणे व मालकी हक्कांची पडताळणी न करता फेरफार करणे आणि महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील सार्वजनिक सुविधेच्या जमिनींचे कथित गैरव्यवहार आणि चुकीच्या पद्धतीने सत्ता प्रकारातील बदल केल्याचेही समोर आले आहे.

धुळे येथे वर्ष २०२२ मध्ये नगर भूमापन अधिकारी या पदावर असताना पवार यांनी चक्क जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचा गैरवापर करून भूखंडांच्या मोजणीमध्ये हेराफेरी केल्याचे समोर आले होते. तेव्हा ७ मे २०२२ रोजी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचा वापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शिस्तभंगाची कारवाई झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीत कोणताही बदल केला नाही. उलट अकोला येथेही धुळे पेक्षा ही मोठी कामगिरी करून कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी कार्डांमध्ये हेराफेरी केली.तेव्हा भुमि अभिलेख विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे महसूल मंत्रालयात तर खोलवर रुजलेली नाही ना?” अकोला जिल्ह्यात उच्छाद मांडलेल्या निलंबित व आरोपी असलेल्या उपअधीक्षक पंकज पवार यांच्या असंख्य अनियमिततेमुळे, स्वअधिकारातील तयार फेरफार मुळे अगोदर त्याचे निलंबन  करण्यात आले आणि २ जून रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अनियमिततेमुळे व भ्रष्टाचारामुळे पवार यांनी केलेल्या कामांच्या, दिलेल्या चुकीच्या मोजण्यांच्या व आदेशांच्या,तसेच आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन अनधिकाराने अनेक नवीन मिळकत पत्रिका तयार करून आणि अनेक मिळकत पत्रिका दुरुस्त देखील केलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून अशा स्वरूपाच्या गंभीर चुका करून मोठी कमाई केली आहे. तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य पत्नी, मुलांच्या व नातेवाईकांच्या नावावर जमा केलेल्या त्यांच्या संपुर्ण संपत्तीची एकदा उच्चस्तरीय चौकशी करून त्याचा शोध घेतला पाहिजे.अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!