अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या अकोला भुमि अभिलेख कार्यालयातील जवळपास १४०० प्रापर्टी कार्डासह शासकीय कागदपत्रांमध्ये घोळ करून शासन व संबंधित मालमत्ता धारकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल असलेले तत्कालीन उप अधीक्षक पंकज पवार यांनी शासकीय बनावट कागदपत्रे तयार करणारा-या ‘विक्की’च्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे लेखी आदेश जिल्हा अधीक्षकांनी देऊनही पवार यांनी त्या विक्कीला अभय दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तत्कालीन उप अधीक्षक पंकज पवार यांनी प्रताप उघडकीस येत असून, कार्यालयात ‘पारधी’ सारखं फासे टाकून ‘विक्की’ आणि यासारख्याच्या माध्यमातून पवार यांनी हा घोटाळा केला आहे. हे प्रथमदर्शनी दिसून येते. दरम्यान अकोला शहरातील दोन जणांनी खोटा व बनावटी मालमत्ता पत्रक तयार करून देऊन आर्थिक फसवणुकी बाबत ‘विक्की’च्या विरोधात १० जानेवारी २०२५ रोजी भुमि अभिलेख कार्यालय जिल्हा अधीक्षक खंडेलवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
उपरोक्त तक्रारीत मौजा अकोला येथील शिट नं. … बी, प्लॉट नं. ४+९/१/……. चे बनावटी मालमत्ता पत्रक तयार करून विक्कीने आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप लावला आहे. अर्जदार यांनी नमुद केल्याप्रमाणे प्रमाणे अर्जदाराच्या मित्राने खरेदीने फेरफार नोंद करणे ‘विक्की’ सोबत संपर्क केला असताना आपण खरेदी विक्री व सब रजिस्टार ऑफिस अकोला, भुमि अभिलेख ऑफिस, तहसिल ऑफिस, महानगरपालिका अकोला व एस.डी.ओ. ऑफीस अकोला येथील संपुर्ण काम करतो असे सांगीतले. अर्जदार व त्यांच्या मित्राने चर्चा करून ५५ हजार रुपयात मध्ये काम देण्याचे ठरले. त्यानुसार दि. ७ नोव्हेंबर २०२४ ला १० हजार रुपये आणि दि.१३ नोव्हेंबर २०२४ ला ४४ हजार रुपये असे फोनपे मधून दिले असे नमुद आहे.
सर्वकाही ठरून पैसे दिल्यानंतर ‘विक्की’ने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी नोंद असलेले मालमत्ता पत्रक आणि बक्षीस पत्र बनवून दिले आणि सब रजिस्टर ऑफीस येथे जाउन नोंद करून घ्या. साहेबांसोबत बोलणे झालेले आहे. जेव्हा सब रजिस्टर ऑफीस येथे विक्कीने सांगितलेल्या साहेबांना कागदपत्र दिले. कागदपत्राची तपासणी केली असता मालमत्ता पत्रकावरील नोंद ऑनलाईन दिसत नाही. ही कागदपत्र खोटी व बनावटी असल्याचे सांगितले. विक्कीला संपर्क केला असता त्याचा मोबाईल फोन बंद होता. याबाबत उप अधिक्षक पंकज पवार संपर्क करून सर्व प्रकार सांगितला. संपूर्ण कागदपत्र दाखविले पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही किंवा कारवाईसाठी दिशा दिली नाही.असे जिल्हा अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

जिल्हा अधीक्षक खंडेलवाल यांनी संदर्भीय तक्रारीची दखल घेऊन तक्रारीत उपस्थित केलेल्या मुद्यानूसार व संल्गन मिळकत वरील मौजा अकोला शिट नं…. बी, प्लॉट नं. ४+९/१/… मिळकतीची नोंद खोटी/बनावटी आहे किंवा कसे याची खात्री/पडताडणी करून विहीत मुदतीत कार्यवाही करून अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करावा. तसेच खोटा शासकीय अभिलेख तयार केला म्हणुन संबंधितावर (विक्की) पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा. अन्यथा विलंबाची जबाबदारी कायम करण्यात येईल, याची याव्दारे समज देण्यात येत आहे.असे जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल यांनी तत्कालीन उप अधीक्षक व आरोपी पंकज पवार यांना २१ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या पत्रात आदेशीत केले आहे. या एका प्रकरणात पवार यांनी घेतलेल्या ‘भर’ भूमिकेमुळे त्यांनी केलेल्या घोटाळ्यात अनेक तिकडमबाज सहभागी असल्याचे दिसून येते.
शासकीय बनावट कागदपत्रे तयार करून देणा-या ‘विक्की’ला अभय मिळवून देणारे पंकज पवारांच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण होते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या घोटाळ्यात पंकज पवार हे हिमनगाचे एक टोक असून पालकमंत्री ना.आकाश फुंडकर यांनी कुठल्याही परिस्थितीत या घोटाळ्यातील गुन्हेगारांना शिक्षा होईल, असं पत्रकारांना सांगितले. पण झारीतील शुक्राचार्यचं काय ?
