हेडसाळ टाळा ! अकोल्यात उद्या रविवारी हाडांची BMD चाचणी

0

अकोला दिव्य न्यूज : शरीरातील प्रत्येक अवयवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारिरीक हालचाल करण्यासाठी असलेल्या हाडांकडे मात्र कळत नकळत दुर्लक्ष केले जाते आणि यामुळे हाडं हळूहळू निकामी अवस्थेंत पोहचतात. म्हणजेच हाडं ठिसूळ होतात. वैद्यकीय भाषेत ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणून याला ‘सायलेंट’आजार म्हणतात. अलिकडच्या काळात पाठदुखी, कंबरदुखी, मानेचे दुखणे, गुडघे दुखी, गुडघ्याची वाटी घासणे, पाठीला बाक येणे (कुबड) इत्यादी हाडांच्या अनेक आजारांमुळे जीवन जगण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकत नाही.

हे असं का ? तर हा असा आजार आहे की, ज्यामध्ये हाडांची घनता कमी होते. हाडे आतून सच्छिद्र व कमकुवत होतात. यामुळे किरकोळ पडल्याने किंवा वाकल्यानेही हाड मोडण्याचा धोका वाढतो. हा आजार प्रामुख्याने रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये व वाढत्या वयातील व्यक्तींमध्ये अधिक आढळतो आणि हाड तुटल्या शिवाय हाडांच्या ढिसाळपणाचे निदानास उशीर होतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन अकोला आर्थोपॅडिक असोसिएशनकडून MOA Day निमित्त १ ते ७ मे पर्यंत सप्ताह साजरा केला जातो आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

महाराष्ट्र ऑर्थोपॅडिक असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि इंडियन मेडिकल कॉन्सील अकोला शाखा अध्यक्ष डॉ.रणजीत देशमुख आणि मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते व अस्थीव्यंग तज्ज्ञ डॉ. तरुण राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले आहे.या दरम्यान उद्या रविवार ३ मे २०२६ रोजी अकोला आकाशवाणी केंद्रासमोर IMA हॉल मध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हाडाची क्षमता (ठिसूळता) तपासणी शिबिर आयोजित केले आहे. शिबिर मोफत असून या शिबिरात हाडांची ठिसूळता तपासणीसाठी BMD (Bone Mineral Density) ही तपासणी केली जाणार आहे. हाडांचे आजार असलेल्या रूग्णासोबतच सुदृढ निरोगी व्यक्तींनी आपल्या हाडांची ढिसूळता तपासून घ्यावी असे आवाहन अकोला ऑर्थोपॅडिक सोसायटीचे अध्यक्ष व ऑर्थोपॅडिक तज्ज्ञ डॉ.रजल सिंगी यांनी केले आहे.

रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन संप्रेरक कमी झाल्यामुळे हाडांचा ऱ्हास वेगाने होतो. शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D-3 ची कमतरता असणे. नियमित व्यायाम न करणे.अति प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान करणे. आणि विशेषतः ७५ वर्षांवरील स्त्री-पुरुषांमध्ये नैसर्गिकरित्या हाडे कमकुवत होतात.

हाडांची झीज होऊ नये म्हणून आहारात दूध, दही, पनीर, कडधान्ये, गडद पालेभाज्यांचा समावेश करा. चालणे, जिने चढणे, योगासने यांसारखे वजन उचलण्याचे व्यायाम हाडे मजबूत करतात.शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व तयार होण्यासाठी रोज २० मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.हाडांच्या आरोग्याबाबत शंका असल्यास त्वरित अस्थिरोग तज्ञांचा (Orthopedic) सल्ला घ्यावा, असे यावेळी डॉ. तरूण राठी आणि डॉ. राजल सिंगी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here