अकोला दिव्य न्यूज : जवळपास प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर असताना अकोला शहराला औद्योगिक वसाहतीमधील उद्योग-व्यवसायाचा मोठा आधार वाटतो. मात्र महावितरण कंपनीच्या बेबंदशाही कारभार आणि औद्योगिक वसाहतीमधील प्रश्नांबाबत असलेल्या उदासीनतेमुळे येथील उद्योजक हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता गैरहजर राहिल्याने, अधिकाऱ्यांना समस्यांची जाणीव नाही. कोणाचाही मुलाहिजा नाही.धाकही नाही !

औद्योगिक ग्राहकांसाठी अकोला येथील विद्युत भवन येथे होणारी बैठक अकोला इंडस्ट्रीज असोसिएशने उद्योजकांच्या सोयीच्या दृष्टीने, स्वागत सेल म्हणून असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केली होती.बैठकीस महावितरणचे मुख्य अभियंता नाईक आणि संबंधित अधिकारी व तांत्रिक पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांचा पाढा वाचत वारंवार होणारे ट्रिपिंग, नवीन वीज कनेक्शन मिळण्यात होणारा विलंब (काही प्रकरणांमध्ये १ ते १.५ वर्षे), अकोला विकास केंद्रात नवीन सबस्टेशन उभारणीची गरज, तुकाराम सबस्टेशनवरील वाढता लोड कमी करण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, बाळापूर भागातील स्पिनिंग मिलला सुरळीत वीजपुरवठा तसेच पिंपळकोठा व विझोरा भागातील ट्रिपिंग समस्या यासारखे महत्त्वाचे मुद्दे मांडले.

एमआयडीसीमधील वीज बिलिंग व प्रोसेसिंगमध्ये होणारा विलंब, ऑनलाइन तक्रारींवर प्रतिसादाचा अभाव, स्वतंत्र विद्युत कर्मचारी नियुक्ती, मान्सून पूर्व देखभाल आणि नवीन उद्योजकांना वेळेत वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याबाबतही लक्ष वेधले.याशिवाय शहरातील एस.पी. कार्यालयाजवळ ड्रेनेज लाईनवर उभारलेल्या विद्युत खांबामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान मार्च महिन्यात निर्गमित औद्योगिक वीज देयके सदोष असल्याचा मुद्दा विशेषत्वाने मांडण्यात आला. वीज नियामक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन TOD (Time of Day) कालावधीप्रमाणे मीटर अद्ययावत न केल्यामुळे दिवसाचा वापर रात्री दाखविला जात असून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे निदर्शनास आले. मुख्य अभियंता नाईक यांनी यावर तातडीने चाचणी विभागामार्फत पडताळणी करून देयके दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे या बैठकीस जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता गैरहजर होते. यावर उपस्थित उद्योजकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. महावितरण अधिकाऱ्यांची औद्योगिक प्रश्नांबाबत उदासीनता असल्याचे चित्र दिसून आले.
अनेक उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करून प्रकल्प उभारले असले तरी वीज कनेक्शन व पुरवठा विलंबामुळे ते सुरू होऊ शकत नाहीत. उद्योगांच्या प्रगतीसाठी स्थिर व दर्जेदार वीजपुरवठा अत्यावश्यक असून, या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सभेत सचिव नितीन बियाणी, उमेश मालू, उपाध्यक्ष नरेश बियाणी, माजी अध्यक्ष द्वारका चांडक, सहउपाधक्ष कमलेश अग्रवाल, विवेक बिजवे, विनोद मनवाणी तसेच विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी उद्योजकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या.
बैठकीस लघुउद्योग भारती,अकोट इंडस्ट्रीज असोसिएशन, मुर्तीजापुर इंडस्ट्रीज असोसिएशन व इतर औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक व असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव नितीन युगलकिशोर बियाणी यांनी करून आभार व्यक्त केले.
