Sunday, April 26, 2026
No menu items!
No menu items!
Home३८ वर्षांपासून आरोग्यसेवेचा वसा ! बसंती रुग्णालयाचा स्थापना दिन उत्साहात साजरा

३८ वर्षांपासून आरोग्यसेवेचा वसा ! बसंती रुग्णालयाचा स्थापना दिन उत्साहात साजरा

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य व सामाजिक क्षेत्रात मागील ३८ वर्षांपासून आरोग्यसेवेचा वसा अधिक दृढ करताना सामाजिक जबाबदारीचे निर्वाहन करण्यात अग्रेसर बसंती रुग्णालयाचा स्थापना दिनाचा सोहळा मोफत नेत्र तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. बसंतीबाई लक्ष्मीनारायण चांडक यांच्या अर्धपुतळ्याला विश्वस्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात येथील ‘डायलिसिस केंद्र’ विषयी माहिती देताना सांगितले की, या केंद्रात सध्या डायलिसिससाठी २५ मशिन कार्यरत असून महाराष्ट्रातील अग्रगण्य व स्वतंत्र डायलिसिस सुविधा केंद्रापैकी एक केंद्र अशी ओळख आहे. विशेष बाब म्हणजे, रुग्णांना मोफत औषधे पुरविली जातात. इतकेच नव्हे, तर बाहेर गावाहून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा प्रवास खर्चही उचलला जातो. रुग्णांना परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त ट्रस्ट तर्फे दरवर्षी १ लाख रुपयांचा साहित्य पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येते. गेल्या २० वर्षांपासून श्राद्ध पक्ष व नवरात्रीमध्ये महिनाभर मोफत भोजन दिले जाते.

यावेळी रुग्णालयाचे व्यवस्थापक विजय मुंदडा यांनी सांगितले की, भविष्यात अधिकाधिक रुग्णांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.यावेळी संस्थेसाठी दीर्घकाळ सेवा देणाऱ्यां व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. अकोला नेत्र अस्पतळात सेवा केलेले डॉ.श्रीकांत मालपाणी व सलग ३७ वर्षांच्या सेवेबद्दल व्यवस्थापक विजयकुमार मुंदडा यांचा खेतान यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष श्यामबाबू चांडक यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल अकोला माहेश्वरी समाजातर्फे सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला पूजा खेतान, अँड.सतीश भुतडा, श्रीकिशन अग्रवाल, विनोद खेतान, डॉ.एन.के.माहेश्वरी, विनोद झंवर, मनोज चांडक, प्रफुल्ल चांडक, प्रवीण मोहता, सीए रमेश चौधरी व कमलकिशोर शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर व माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत बसंतीबाई चांडक यांच्या स्मरणार्थ २४ एप्रिल १९८८ रोजी स्थापित झालेल्या संस्थेने गेल्या ३८ वर्षांत आरोग्यसेवेत उल्लेखनीय कार्य केले असून जवळपास ६९ हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. गेल्या ११ वर्षांत विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून अंदाजे १ लाख ४० हजार डायलिसिस प्रक्रिया पूर्ण केल्यात. येथील नेत्ररोग, डायलिसिस, मूत्र रोग, अस्थिरोग आणि फुफ्फुसरोग विभागांमार्फत आधुनिक वैद्यकीय सेवा प्रदान केली जाते. येथे फॅकोमोतीबिंदू शस्त्रक्रिया, किडनी स्टोन उपचार, फिस्टूला शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर, दमा व न्यूमोनिया यासारख्या आजारांवर प्रभावी उपचार दिले जातात. महत्वाचे म्हणजे येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. याव्यतिरिक्त, ट्रस्टकडून संस्थेला दरवर्षी १ लाख रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात येते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!