खामगावला नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ! लग्नाला रक्तरंजित वळण; चौघांविरोधात गुन्हा

0

अकोला दिव्य न्यूज : खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात लग्न समारंभात नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने गंभीर रूप धारण केल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जोशी लेआउट येथील मैदानावर सुरू असलेल्या लग्न समारंभात मृतक शोएबखान अमिनखान (२२) हा रात्री उपस्थित होता. रात्री सुमारे १० ते १०.४० वाजण्याच्या दरम्यान नाचण्याचा कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाला. प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद पुढे चिघळला.वाद तीव्र झाल्यानंतर आरोपींनी एकत्रितपणे शोएबखान याच्यावर चाकू, फायटर, वस्तरा व दगड यांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या.जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद साबीर शेख मुसा (३६, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१) , ११८(२) , ११५(२) व ३(५) अन्वये शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब (सर्व रा. बर्डे प्लॉट, खामगाव) तसेच शेख रफिक (रा. अकोला) यांच्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांना सोपविण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here