Saturday, April 25, 2026
No menu items!
No menu items!
Homeबुवा तेथे बाया ! स्त्रिया का फसतात ? खरात सारख्याचा नादी का...

बुवा तेथे बाया ! स्त्रिया का फसतात ? खरात सारख्याचा नादी का लागतात

अकोला दिव्य न्यूज : बुवा तेथे बाया आणि खरात सारख्या बाबाला स्त्रिया का फसतात ? यावर विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी जवळजवळ २ तासांपर्यंत विविध उदाहरणे देत सविस्तर विवेचन करताना पूजा पाठ, भक्ती, श्रद्धा यासर्व धार्मिक बाबी मान्य केल्या तरी अलिकडच्या काळात भोंदूगिरी व अंधश्रद्धेला उच्च सुशिक्षित आणि भले भले बळी का पडतात ? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला.

नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात आयोजित व्याख्यानाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.विजय वडट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. जनमंच या एनजीओचे सल्लागार प्राध्यापक शरद पाटील, माजी आमदार अशोक धवड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राध्यापक हरीश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

जाहीरात

यावेळी प्राध्यापक श्याम मानव यांनी सुंदरदास महाराजांपासून तर आसाराम व राम रहीम पर्यंत अशा सर्वच भोंदू महाराजांचा विस्तृत समाचार घेतला. समाजातील स्त्रिया अशा भोंदू बाबाला कशा बळी पडतात याचे अनेक दाखले प्राध्यापक श्याम मानव यांनी सांगितले. राज्यातील व देशातील बहुतेक सर्वच बाबांनी महिलांचे शोषण केले मोक्ष मिळवून देतो, कुटुंबातील प्रत्येकाला मोक्ष मिळवून देतो आणि कुटुंबाची आर्थिक प्रगती करून देतो, असाध्य रोग बरे करून देतो म्हणून वारंवार महिलांचे शोषण कशाप्रकारे केल्या जाते हे सविस्तर सांगितले.

ज्या महिला भोंदू बाबाच्या आहारी जात नाहीत अशा महिलांना प्रसंगी भीती वा धाक दाखवून, त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे त्यांनी सांगितले. आज, समाजामध्ये खरंच किती भयंकर चित्र निर्माण झाले आहे. याची प्रचिती मानव यांचं व्याख्यान ऐकताना वारंवार येत होती. वास्तविक, आपल्या राज्यामध्ये सन 2013 मध्ये जादूटोणा कायदा सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. परंतु, या कायद्याची अंमलबजावणीच सरकारी यंत्रणा करीत नसल्यामुळे आज खरात सारखे भोंदू आपणास सर्वत्र दिसून येतात. का बरं स्त्रिया अशा बाबाच्या नादी लागतात ? त्यांचे कुटुंब सुद्धा का हरकत घेत नाहीत ? अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा प्रवृत्तीला एक वेळ अज्ञानी व्यक्ती बळी पडू शकते परंतु, आज, समाजामध्ये सुशिक्षित वर्ग सुद्धा सारख्या बाबाच्या नादी लागत असल्याचे पाहून मन सुन्न होते. खरात सारख्या बाबांचे प्रत्यक्ष कारनामे पाहिले किंवा ऐकले तरी आपली आपल्यालाच लाज वाटायला लागते.

आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते इतकेच नव्हे तर सेलिब्रेटी, मोठे उद्योजक अशा बाबांना बळ का देतात किंवा त्यांच्या नादी का लागतात ? हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. पूजा पाठ, भक्ती, श्रद्धा या सर्व धार्मिक बाबी मान्य केल्या तरी भोंदूगिरीला आणि अंधश्रद्धेला चांगल्या चांगल्या व्यक्ती व स्त्रिया का बळी पडतात? हा गंभीर प्रश्न प्राध्यापक शाम मानव यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थित करून आपले संस्कारच यास जबाबदार असल्याची खंत सुद्धा त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केली. खरात सारख्या कडे ज्या स्त्रिया ओढल्या गेल्यात आणि बळी पडल्या, अशा स्त्रियांना दोष न देता लहानपणापासूनच मनावर जे बिंबविल्या जाते तेच पुढे प्रगट होते. मग त्यातूनच खरात सारख्यांचा आर्थिक विकास होत. येथूनच स्त्रियांचे शोषण सुरू होते.

विशेष म्हणजे, प्रा. श्याम मानव यांनी इतर धर्मातील धर्मगुरू किंवा बाबा आपल्या धर्मातील स्त्रियांचे कसे शोषण करतात याबाबत सुद्धा परखडपणे आपले विचार मांडले. प्रा मानव यांनी थोर विचारवंत अत्रे यांच्या पुस्तकातील संदर्भाचा धागा पकडून आपण प्रेरित झाल्याचे आणि त्यातूनच बुवा तेथे बाबा ही संकल्पना पुढे आणल्याचे सांगितले योगायोगाने हे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. प्राध्यापक शरद पाटील आणि प्रा. हरीश देशमुख जवळचे मित्र, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती मी जवळून अनुभवली आहे. प्राध्यापक हरीश देशमुख, यांचे या क्षेत्रातील योगदान सुद्धा मी अनुभवले आहे. अतिशय तळमळीने हे मान्यवर समाजातील अंधश्रद्धा, आणि भोंदू बाबांचे काळे धंदे, कारनामे समाजासमोर आणण्यासाठी गेल्या चार दशकापासून जीवाचे रान करीत आहेत. कालच्या, व्याख्यानातून आता तरी समाजाने विशेषतः सुशिक्षित समाजाने काळजी घ्यावी जेणेकरून पुढे खरात बाबा सारखे भोंदू बाबा निर्माण होणार नाहीत आणि समाजातील आपल्या स्त्रिया शोषित होणार नाही, याची काळजी घ्यावीशी वाटते.

प्राध्यापक मानव यांची पहिल्यांदाच व्यक्तिगत भेट घेण्याचा योग आला. यावेळी कमल फाउंडेशन बाबत त्यांना अवगत करून कमल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प असल्याचे त्यांना सांगितले. खरंच, मानव सरांचे व्याख्यान माझ्यासाठी एक पर्वणीच !

🙏 सतीश दाभाडे, संस्थापक अध्यक्ष, कमल फाउंडेशन, नागपूर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!