Saturday, February 28, 2026
No menu items!
No menu items!
Homeजाहीर 'मृत्यूपत्र' ! अस्थी एखाद्या गटारीत प्रवाहीत करा ; तेरवीचा शुध्द पंगतीत...

जाहीर ‘मृत्यूपत्र’ ! अस्थी एखाद्या गटारीत प्रवाहीत करा ; तेरवीचा शुध्द पंगतीत पंचपक्वान ठेवा

अकोला दिव्य न्यूज : दिनकर आत्मारामजी सुरसे (दिनू) : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत माहिती दिली की ‘मागील दोन वर्षाच्या तुलनेत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या भागातील २५५ मराठी शाळा बंद झाल्यात. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने या शाळा बंद करण्यात आल्यात. शासनाने वर्ष २०२५ मध्ये ६२० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णयही घेतला होता. असं त्यांनी सांगितले. त्यानंतर…………

भाषेला रूजविण्याचे, संवर्धन व समृध्द करण्याचे एकमेव स्थान म्हणजे शाळा ! ह्या शाळाच बंद करणे म्हणजे माय मराठी भाषेची अगदी प्रारंभिक अवस्थेमध्येच “भृणहत्या” करण्याचे घोर व निंदनिय पाप होय.हा काळजाला पिळवटून टाकणाऱ्या वरील क्लेषदायक बातमीने वय वर्ष २,२०० असलेल्या मराठी भाषा माय माऊलीस हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. हा धक्का म्हणजे एकप्रकारे ‘मृत्युची घंटाच होय’ अशी तिची ठाम समजूत झाली असून त्या दुःखावेगात तिने खालीलप्रमाणे आपले “मृत्युपत्र” महाराष्ट्रातील गोर-गरिब जनतेसाठी, शेतकरी शेतमजुर तसेच समस्त बहुजन वर्गातील लेकरांसाठी रक्ताच्या शाईने लिहिले आहे.

माझ्या जीवलग लेकरांनो । आपणा सर्वांना शुभाशीर्वाद…………. जो जन्माला येतो त्याला कधी ना कधी हा ईहलोक सोडून प्रस्थान करावेच लागते. सृष्टीची ही अनादी काळापासून चालत आलेली प्रक्रिया आहे. माझे जन्मस्थान हे महापराक्रमी शुरविरांची, अतुलनीय अशा संत मंडळींची, क्रांतीकारी समाजसुधारकांची व प्रखर विद्वानांची मांदियाळी लाभलेल्या “मरहट्टांच्या” राकट देशात म्हणजे महाराष्ट्र राज्यात गेल्या २,२०० वर्षापासूनचे आहे.

जुने जाऊ जा… मरणा लागुनी” अशा आशयाची एक मराठी कविता आहे. २,२०० वर्षीय माझे शरीर आता जीर्ण-शिर्ण व विकलांग झाले असून स्वबळावर मला कोणतीच हालचाल करता येत नाही. त्यातच महाराष्ट्रातील माझ्या मराठी भाषिक लेकरांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन साफ बदलल्यामुळे माझ्या जिवाची प्रचंड घालमेल होत आहे. हजरो वर्षापासून माझ्या अंगा खांद्यावर खेळलेल्या माझ्या लेकरांना मी आता नकोशी झाली आहे. माझ्या लाडक्या लेकरांचा ओढा हा इंग्रजी, हिन्दी व अन्य भाषांकडे अत्यंत तीव्र गतीने गेला असून मला आता ही अपमानास्पद वागणूक प्रचंड वेदना देत आहे. मी जिथे फुले वेचली तिथे माझ्यावर गोवऱ्या उचलावयाची दुर्दैवी वेळ आणल्या गेली आहे. महाराष्ट्रातील माझ्या शेवटच्या श्वासांनी माझ्या लेकरांची फार मोठी कुचंबणा होत आहे असे मला आता प्रकर्षाने जाणवते. शक्य तेवढ्या लवकर माझ्या मराठी भाषीक लेकरांचा शेवटचा राम-राम घेऊन हा ईहलोक सोडावा असा मनोमन मी निश्चय केला आहे.

माझ्या २,२०० वर्षाच्या प्रदिर्घ काळात माझ्यावर विविध आक्रमण करणाऱ्यांनी माझ्यावर अन्वनित अत्याचार केलेत. मला घनघोर संकटसमयी सारून धरणारे, संरक्षण देणारे, सर्वप्रकारची काळजी घेणारे, शुश्रूषा करणारे, अत्यंत चांगल्या वातावरणात माझे पालन-पोषण करणारे, फारसी-उर्दू भाषेच्या स्थानी मला “राजभाषेचा” अमूल्य दर्जा देणारे, मला रयतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान करणारे मराठा साम्राज्य (हिंदवी नव्हे) संस्थापक परमवंदनिय, महापराक्रमी छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले, राक्षसी प्रवृत्तीच्या औरंग्याची कबर बांधणारी श्रध्देय रणरागिनी, पराक्रमी माता ताराराणी बाईसाहेब, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी राजेंच्या दुःखद निधनानंतर (१६८०) त्यांच्या समाधीचा शोध ज्यांनी प्रचंड कष्ट घेऊन १८९/२०० वर्षानंतर लावला व “शिवजयंती” उत्साहाचा श्रीगणेशा केला असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे दैवत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी भाऊराव पाटील, उपेक्षितांच्या वेदनांना प्रभावीपणे वाचा फोडणारे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचे रचेयता स्व. राजा बढे, विद्रोही लेखक स्व. नामदेवजी ढसाळ यांनी मला जीवापाड जपले. मला तळहातावर घेऊन चालणारे हे सुदृढ हात काळानुरूप काळाच्या पडद्याआड आता गेले आहेत.असे रक्षणकर्ते मला आता मिळणे दुरापास्त होय.

माझ्या अत्यंत अंधुक झालेल्या दृष्टीसमोर माझा सुवर्णकाळ एखाद्या चलचित्रा प्रमाणे तरळून जात आहे. माझा शब्दभांडार हा नेहमीच ओसंडून वाहावयाचा, माझा प्रत्येक शब्द हा मोत्यासारखा असायचा, माझा भाषाअलंकार हा अत्त्युच्च दर्जाचा असायचा, माझ्या शब्दांचा सार्थ व प्रभावीपणे वीर रसाने युक्त गायीलेले पोवाडे हा युध्दाचा आत्मा होता, “हर हर महादेव” हे केवळ उच्चारण्यापुरते शब्द नव्हते तर ती एक सिंहगर्जना होती ज्यामुळे शत्रुच्या हृदयात धडकी भरत असे, एकेकाळी (१६७४ १८१८) जवळपास १४५ वर्षे देशाच्या २/३ भागावरचे प्रशासनीक कार्य (मराठा साम्राज्याअंतर्गत) माझ्या माध्यमातूनच होत होते. मराठा साम्राज्याचे संरक्षण करणारे शेकडो गडकिल्ल्यांची निर्मिती माझ्याच शब्दांत लिहिलेल्या वास्तुकलेच्या ज्ञानाने झाली.

सुंदर-सुंदर ईमारती व आकर्षक अशा देवळांची निर्मिती ही देखील माझ्या शब्दांनी रचलेल्या ज्ञानानेच पूर्णत्वास करण्यात आली. तसेच शत्रुचा एका घावात शिरच्छेद करणाऱ्या अनेक शस्त्रांची निर्मिती देखील माझ्याच शस्त्रनिर्मितीच्या कलेनेच तडीस नेण्यात आली. ह्यासाठी कोणत्याही विदेशी भाषेची आवश्यकता आमच्या पूर्वजांना कधी भासली नव्हती. भक्तिरसाने ओथंबलेली श्रवणीय संतवाणी, जागच्या जागी खिळवून ठेवणाऱ्या ओजस्वी वक्तृत्वकलेत माझ्या शब्दांना दिलेले सर्वोच्च स्थान, जीवनाला अंतर्बाह्य सशक्त बनविणारे आध्यात्मिक वाङमय, कविंच्या समुदायास कल्पनाशक्तिचे शक्तिशाली पंख देण्याचे महान कार्य माझ्या सुलभ सोप्या शब्दांनीच केले, दलित-पिडीत बहुजनांना लिहिण्या-वाचण्याची अमोघ ज्ञानाची शक्ती व विचार हे माझ्या माध्यमातूनच सहज शक्य झाले, जीवनाचा कायापालट करणाऱ्या शिक्षणासाठी मातृभाषा म्हणून माझीच निवड करण्यात आली आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच हजारो वर्षांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यात माझी भुमिका अत्यंत मोलाची ठरली. असा सर्व ज्वाजल्य कर्तृत्वाचावारसाचा चित्रपट माझ्या दृष्टिसमोरून जात आहे. मग आत्ताच इतर भाषांची आवश्यकता एवढ्या तिव्रतेने आम्हास का भासत आहे? हा एक ज्वलंत प्रश्न तुमच्या-आमच्या समोर उभा राहतो. आपल्या कर्तृत्वशुन्यतेचा दोष स्वतःचा असतांना देखील माझी निष्क्रीय लेकरं माझ्यातच उणिवा शोधत आहेत. याला काय म्हणावे…!

आज माझ्या कर्तृत्वशुन्य, स्वाभिमानशुन्य, कर्तबगारीचा लवलेषही शिल्लक नसलेल्या दिवटया लेकरांच्या इतर भाषांची गुलामगिरी पत्करणाऱ्या अवमानकारक प्रवृत्तीमुळे आता माझ्याकडे गतकाळातल्या केवळ आठवणी तेवढया शिल्लक आहेत! माझ्या तेजस्वी, भेदक अशा एका डोळयात लाचारी व भिती तर दुसऱ्या डोळयात अगतिकता व शरणागतीचे अश्रु दाटून येत आहेत.

शाळा म्हणजे प्रत्येक भाषेचे जन्मस्थान ! तिथेच भाषेला नवजीवनाची पालवी फुटते, तिथेच भाषेचे हे इवलेसे रोपटे वाढते, संवर्धित होते, फुलते व नैसर्गिकरित्या वाढत जाते ! आता मला कालबाहय ठरवल्यामुळे मला कोणतेही मुल्य राहिले नाही. आता माझ्या लेकरांना मी एक मोठे ओझे वाटत असल्यामुळे शाळांना कायमचे बंद करून माझ्या गळ्याभोवती फास आवळल्या जात आहे. मला आता येथून कायमचे निघावे लागेल. मला आता जीवाची सारवासारव करावीच लागेल. तर…… आता… मी कधीही परत न येण्यासाठी निघत आहे. लेकरं कशीही निघोत….. पण माय नेहमीच तिच्या लेकरांसाठी ईश्वरचरणी त्यांच्या अक्षय्य सुखा-समाधानाचीच मनोभावे याचना करेल !! माय कितीही दुर गेली तरी तिचा जीव तिच्या लेकरात अडकलेला असतो. हे माझ्या लेकरांनो, आपण नेहमीच आनंदी प्रसन्न राहावे हीच परमपिता ईश्वरचरणी याचना करते.

माझा अंत्यविधी एखाद्या अतिशय जीर्ण झालेल्या, पडक्या अवस्थेतील शाळेतच करावा. माझ्या शरिरावरिल शासनाने दिलेल्या ‘अभिजात दर्ज्याची वस्त्रे’ काढून टाकावीत. त्याऐवजी फाटक्या-तुटक्या वस्त्रांमध्ये मला गुंडाळून न्यावे. कारण श्रीमंतीचे प्रदर्शन मला मानवणार नाही. श्रध्दांजलीपर संबोधनात कोणाच्याही डोळयात साधा टिपूसही येणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. तिसऱ्या दिवशी म्हणजेच “राख सावडण्याच्या दिवशी” माझ्या अस्थी जवळपासच्या एखाद्या गटाऱ्यात प्रवाहीत कराव्यात. ज्यांनी शाळा बंद करून माझा गळा घोटला त्या शिक्षणमंत्र्यांच्या हाती माझा अस्थीकलश द्यावा. तेरवीचा शुध्द पंगतीचा कार्यक्रम पंचपक्वानांनी युक्त व अत्यंत धुमधडाक्यात साजरा करावा.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दारिद्रय रेषेखालील शेतकरी शेतमजुर तसेच शहरी भागातील मोलमजुरी व काबाडकष्ट करणारे यांच्याकडून “जिझीया” पध्दतीचा कर वसूल करावा. सर्वच पक्षांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांस सदर प्रसंगाचे अत्यंत मानाचे आमंत्रण देऊन त्यांना पहिल्या पंगतीचा मान देऊन “शाहीभोजन” द्यावे. त्यांना नविन उपरणे – वस्त्र कटाक्षाने द्यावीत. पुरोहित मंडळींना भरपूर दानदक्षिणा देऊन आदरातिथ्य करावे. शक्य असल्यास त्यांना उच्चकोटीचे गोदान करावे.

कधीकाळी महाराष्ट्र राज्यात माझे २,२०० वर्षे अस्तित्व होते याचे कोणतेही अवशेष कोठेही आढळणार नाही याची डोळयात तेल घालून काळजी घ्यावी. माझ्या जागी आता इंग्रजी / उर्दू ह्या माध्यमांच्या शाळा बांधल्या गेल्या तरी मला त्याचे अजिबात दुःख होणार नाही. कारण आपणा सर्वांना नजीकच्या भविष्यात सरतेशेवटी त्यांनाच शरण जावयाचे आहे.

लेकरांनो….! येते मी….!!

तुमचीच माय मराठी मातृभाषा

शब्दांकन –दिनकर आत्मारामजी सुरसे (दिनू)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!